---Advertisement---

नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनांच्या नियुक्तीवर भाजप ठाम, शिंदे गटाच्या नाराजीला झटका ?

by team
---Advertisement---

नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा आणि वाद सुरू होते. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये या पदासाठी रस्सीखेच सुरू असताना, आता भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर आली आहे. नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच कायम राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्य सरकारकडून शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी (Maharashtra Guardian Minister List) जाहीर करण्यात आली. यात नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन यांना या पदाची जबाबदारी देण्यात आली होती. परंतु  नाशिकमधून शिंदे गटाने या पदावर दावा केल्याने पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.

यानंतर आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्रिपदाबाबत स्वतः बोलणार आहेत. आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामुळे शिवसेना-भाजप युतीत काही प्रमाणात तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी यापूर्वी महाजन यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता.  तरीही भाजपने गिरीश महाजन यांच्यावर विश्वास दाखवत, नाशिकसाठी त्यांच्या अनुभवाला प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. यामुळे महायुतीतील मतभेद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे.

महाजन यांचं नाव जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र, भाजपने आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांचा जिल्ह्यातील कार्याचा अनुभव आणि नेतृत्वक्षमता पाहता भाजपने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment