विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपच्या ‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

#image_title

विधानसभा निवडणुकीनंतर राहुल नार्वेकर यांची पुन्हा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी महायुती तर्फे भाजपचे राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उद्या ते अर्ज दाखल करणार आहेत.

7 जुलै 2022 रोजी रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यापासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला असला तरी अद्यापही खातेवाटप झालेले नाही. शिंदेसेनेकडून काही महत्त्वाच्या पदांची मागणी करण्यात आली होती. त्यात विधानपरिषदेच्या सभापतीपदाचा देखील समावेश होता

कोण आहेत राम शिंदे ?
राम शिंदे यांना देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस म्हणून ओळखले जाते. ते 2014 मध्ये विधानसभेवर निवडून आले, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (एसपी) उमेदवार रोहित पवार यांच्याकडून राम शिंदे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांना भाजपाकडून विधानपरिषद सदस्यपदी निवड झाली. नुकत्याच झालेल्या विधानसभा 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा रोहित पवार यांच्याकडून त्यांचा अवघ्या 1200 मतांनी त्यांचा पराभव झाला.