सोलापूर : भारतीय जनता पार्टीतर्फे सोलापूर व माढा लोकसभेसाठी अनुक्रमे राम सातपुते व खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आपली उमेदवारी मंगळवारी दाखल केली आहे. अर्ज दाखल करतांना त्यांनी रणरणत्या उन्हात शक्तिप्रदर्शन केले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती देत उमेदवारांना बळ दिले. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामान्य जनतेचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचे कोणी वाकडे करू शकत नाही, असा दावा केला.
जुना पुणे चौत्रा नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून भर दुपारी तापमानाचा पारा चाळीशीच्या पुढे गेलेला असतांना अशा तप्त उन्हात सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची विजय संकल्प यात्रा काढण्यात आली. नंतर माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे देखील या यात्रेत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुखवटे घालून हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी भाजप व महायुतीच्या जयजयकारासह ‘जय श्रीराम’ च्या घोषणा देण्यात आल्या. या मिरवणुकीत हिंदुत्वाचा गजर केला जात होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, सुभाष देशमुख, विजय देशमुख, जयकुमार गोरे, समाधान अवताडे या सर्व भाजपच्या आमदारांसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बबनराव शिंदे, संजय शिंदे, यशवंत माने हे आमदार सहभागी झाले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदविला.