दिल्ली विधानसभा निवडणूक 2025 मध्ये आम आदमी पक्षाचा पराभव झाला असून, त्यामागे लिकर घोटाळा, नेतृत्वातील अस्थिरता, INDIA आघाडीतील विसंवाद आणि भाजपाच्या मजबूत प्रचार रणनीतीचे मोठे योगदान असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाने प्रभावी प्रचार करत ‘आप’ सरकारच्या भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला, तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेने निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम झाला.
लिकर घोटाळ्याचा फटका – विश्वासाला तडा
दिल्लीतील तथाकथित ‘लिकर घोटाळा’ हा आम आदमी पक्षाच्या पतनाला जबाबदार ठरला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अनेक वरिष्ठ नेत्यांवर आरोप झाले. ईडी व सीबीआयच्या तपासांमुळे ‘आप’च्या प्रतिमेला तडा गेला. भाजपाने निवडणुकीदरम्यान हा मुद्दा जोरदारपणे मांडला, ज्यामुळे मतदारांचा कल बदलला.
आतिषी मुख्यमंत्री पदावर, पण प्रभावी ठरल्या नाहीत
लिकर घोटाळ्याच्या आरोपांनंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आतिषी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र, त्या जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरल्या. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही त्या मोठे निर्णय घेऊ शकल्या नाहीत, याचा फटका ‘आप’ला बसला.
विशेष म्हणजे, केजरीवाल यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आले असतानाही ‘आप’ने आतिषी यांना पुढे आणले आणि “आम्ही घराणेशाहीला पाठिंबा देत नाही” असा संदेश दिला. मात्र, हा डाव फारसा यशस्वी ठरला नाही.
अण्णाजारेंचा प्रभाव – केजरीवाल यांची प्रतिमा डागाळली
अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीमध्ये मोठे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते, ज्यातून ‘आप’चा जन्म झाला. मात्र, या निवडणुकीत अण्णा हजारेंनी केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधला. “केजरीवाल आता भ्रष्टाचाराविरोधी नाहीत, तर संधीसाधू राजकारणी बनले आहेत” असा आरोप त्यांनी केला.
हे विधान ‘आप’च्या प्रतिमेवर परिणाम करणारे ठरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिक प्रतिमेला धक्का बसल्याने त्यांचे पारंपरिक मतदारही नाराज झाले.
मोफत योजनांपेक्षा भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रबळ
केजरीवाल सरकारने मोफत वीज, पाणी आणि महिलांसाठी मोफत बससेवा यासारख्या योजना राबवल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी या योजनांपेक्षा भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला अधिक महत्त्व दिले. भाजपाने प्रचारात हेच अधोरेखित केले की, ‘आप’ सरकार जनतेच्या पैशांचा अपहार करत आहे.
INDIA आघाडीने साथ सोडली?
राष्ट्रीय स्तरावर भाजपाविरोधात उभी असलेली INDIA आघाडी दिल्ली निवडणुकीत कुठेच प्रभावी दिसली नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांनी जाहीर पाठिंबा दिला असला तरी, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हे नेते दिल्लीमध्ये प्रचारासाठी फिरकलेच नाहीत.
विशेष म्हणजे, काँग्रेससोबत केलेल्या आघाडीचा फटका ‘आप’ला बसला. काँग्रेसला काहीच जागा मिळवता आल्या नाहीत, मात्र काँग्रेसच्या पारंपरिक मतदारांनी ‘आप’ला पाठिंबा न देता भाजपकडेच कल दाखवला.
भाजपाच्या रणनीतीचा प्रभाव
भाजपाने दिल्ली निवडणुकीसाठी जोरदार रणनीती आखली होती. दिल्लीतील भाषिक विविधतेचा विचार करून, वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी उतरवले गेले. विशेषतः, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबमधील लोकसंख्या अधिक असलेल्या भागांमध्ये त्या त्या राज्यांच्या नेत्यांनी सभा घेतल्या, ज्यामुळे भाजपाला मोठा फायदा झाला.
मुस्लिमबहुल भागांमध्येही भाजपाने प्रभावीपणे प्रचार केला. दुसरीकडे, ‘आप’ने दलित-मुस्लिम मतदारांसाठी कागदोपत्री प्रेम दाखवले, पण प्रत्यक्ष कृती नव्हती, असा आरोप भाजपाने केला. परिणामी, ‘आप’च्या मतपेढीला मोठा फटका बसला.
‘दारू’न पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा पराभव हा भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे झाला असेच म्हणावे लागेल. लिकर घोटाळा, नेतृत्वातील अस्थिरता, INDIA आघाडीतील विसंवाद, अण्णा हजारेंची भूमिका आणि भाजपाच्या प्रभावी प्रचार तंत्राने ‘आप’ला मोठा फटका दिला.
भाजपाने अत्यंत नियोजनबद्ध प्रचार केला आणि विरोधकांच्या कमकुवत बाजूचा पुरेपूर फायदा घेतला. यामुळेच 2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा दारू घोटाळ्यामुळे पराभव झाल्याची चर्चा रंगली आहे.