तरुण भारत : विरोधी पक्ष ऐक्याच्या नावाखाली अंधारात चाचपडत असताना भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी कधीचीच सुरू करून टाकली आहे. अमेरिका आणि इजिप्तच्या दौ-यावरून परत आल्यानंतर विमानतळावरच मोदींनी देशातील परिस्थिती कशी आहे, याबाबतची विचारणा भाजपा नेत्यांकडे केली होती. BJP Elections 2024 याचाच अर्थ परदेशात असतानाही मोदींच्या मनात सतत देश आणि देशवासीयांचे विचार घोळत होते. मोदींचे शरीर अमेरिकेत होते, मन मात्र भारतात होते, असे म्हटले तर ते चूक ठरू नये. लोकसभा निवडणुकीला आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. २०२४ च्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीचे वेध भाजपासह सर्वच राजकीय पक्षांना लागणे स्वाभाविक आहे.
त्याआधी यावर्षीच्या अखेरीस म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तेलंगणा, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश अशा पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. पाच राज्यांत एकाचवेळी विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून त्याकडे पाहिले जाणे स्वाभाविक आहे. या पाच राज्यांतील निवडणूक निकालांचा काही ना काही परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे आव्हान भाजपासमोर राहू शकते. मिझोराम हे राज्य फार मोठे नाही, मात्र तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश ही राज्ये राजकीयदृष्ट्या प्रभावी आहेत. यातही मध्यप्रदेश या एकाच राज्यात भाजपाची सत्ता आहे, तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणात चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती सत्तेत आहे. मध्यप्रदेशातील सत्ता कायम राखण्यासोबत किमान राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्तेवर येण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे.
तेलंगणात आतापर्यंत भाजपाचा फारसा प्रभाव नाही, त्यामुळे किमान या राज्यात प्रबळ विरोधी पक्ष बनवण्याचे भाजपाचे स्वप्न राहू शकते. त्यामुळेच भारतात परत आल्याबरोबर मोदींनी बैठकांचे सत्र सुरू केले. संघटनात्मक फेरबदलाबरोबर मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावरही या बैठकीत चर्चा झाली. BJP Elections 2024 हे कमी होते की काय म्हणून मोदींनी मंत्रिपरिषदेची बैठकही बोलावली. सामान्यपणे मंत्रिमंडळात फेरबदल करायचे असतील वा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर मंत्रिपरिषदेच्या बैठकीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी संवाद साधत असतात. यानंतर भाजपाने काही संघटनात्मक बदल केले. पंजाब, झारखंड, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांतील प्रदेश अध्यक्ष बदलवून टाकले. नंतर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पूर्व भारत, उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील राज्यांची बैठक बोलावली. BJP Elections 2024 या प्रत्येक बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघटन महामंत्री बी. एल. संतोष प्रामुख्याने उपस्थित आहेत.
संघटनात्मक बांधणी कशी करावी, पक्ष कसा चालवावा आणि वाढवावा हे देशातील सर्व राजकीय पक्षांनी भाजपाकडून शिकण्यासारखे आहे. कोणत्याही राजकीय पक्षात सर्व नेत्यांचा ओढा हा विधानसभा वा लोकसभा निवडणुका लढवून सत्तेची पदे मिळवण्याकडे असतो, पण भाजपा हा एकमेव पक्ष देशातच नाही तर जगात असावा, जिथे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहत पक्षविस्ताराचा विचार करणारी नि:स्वार्थी नेत्यांची एक फळी आपला राजकीय फायदा न पाहता चोवीस बाय सात तेथे काम करत असते. १९८४ मध्ये लोकसभेच्या २ जागा जिंकणा-या भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तीनशेपारचा पल्ला गाठला होता, हे यश जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे आहे, तसेच ते भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचेही आहे. देशातील एकही राज्य नसेल जिथे भाजपाची शाखा नसेल. २०१४ नंतर तर भाजपाने अमित शाह यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ११ कोटी सदस्यांची नोंदणी करत जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून विश्वविक्रम नोंदवला. हे दीडशतकी वाटचाल करणा-या काँग्रेसला कधी जमले नाही. काँग्रेसमध्ये पक्षसंघटनेचे फारसे अस्तित्व कधी जाणवत नाही.
भाजपात आधी देश, मग पक्ष आणि सर्वात शेवटी मी असा विचार करणारी कार्यकत्र्यांची आणि नेत्यांची भक्कम फळी आहे, तर काँग्रेसमध्ये आधी मी, नंतरही मी आणि शेवटीही मी असा आत्मकेंद्री विचार करणारी कार्यकर्त्यांची फळी आहे. पक्ष आणि देश खड्ड्यात गेला तरी चालेल पण माझे पोट भरले पाहिजे, असा विचार करणारी संधिसाधू नेत्यांची मोठी टोळी ही काँग्रेसची डोकेदुखी आहे. निवडणूक कशा जिंकाव्या, हे भाजपाकडून शिकण्यासारखे आहे. अमित शाह हे तर निवडणूक व्यवस्थापनाचे कुशल तज्ज्ञ आहेत. एक एक निवडणूक संपत नाही तोच भाजपा दुस-या निवडणुकीच्या तयारीला लागत असते. हे कुणाला खोटे वा अतिरंजित वाटत असले तरी ती वस्तुस्थिती आहे. BJP Elections 2024 भाजपात नेत्यांची आणि कार्यकत्र्यांची एक फळी अशी आहे, जी प्र्रसिद्धीच्या झोतात न येता आपले काम मुकाट्याने करत असते. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही निवडणुकीतील विजयाने भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते जसे शेफारून जात नाहीत, तसेच ते निवडणुकीतील पराभवाने खचूनही जात नाहीत.
त्यामुळे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर १९८४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला फक्त दोन जागा मिळाल्या तरी भाजपा नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास खचला नाही. आता आमचे कसे होणार म्हणून नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपा सोडून दुस-या पक्षात धाव घेतली नाही. तर ‘फिर सुबह होंगी’ म्हणून नव्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने कामाला लागले. भाजपाची संघटनात्मक बांधणी अतिशय निर्दोष अशी आहे. भाजपाने आणलेली पन्ना प्रमुखांची रचना तर अफलातून म्हणावी लागेल. मतदारयादीच्या एका पानावर जेवढ्या मतदारांची नावे असतील तेवढ्या मतदारांशी संपर्क साधण्याची जबाबदारी एका कार्यकर्त्याला दिलेली असते आणि तो आपल्यावरची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत असतो. यातून मला काय मिळणार, माझा काय फायदा होणार असा विचारही त्याच्या मनात येत नाही. जनसंपर्काची भाजपाची स्वत:ची एक शैली आहे. सामान्यपणे अन्य पक्षांत जनसंपर्कांची जबाबदारी खालच्या कार्यकर्त्यावर ढकलून वरचे नेते घरी बसतात, पण तसे भाजपात कधी होत नाही.
अमित शाह यांच्यापासून सगळे केंद्रीय मंत्री, खासदार, भाजपाचे पदाधिकारी, मुख्यमंत्री, प्रदेश भाजपा अध्यक्ष, मंत्री आणि आमदार जनसंपर्कात गुंतले असतात. विशेष म्हणजे मंत्री, खासदार आणि आमदार नेमून दिलेले काम करतात की नाही, यावर भाजपाचे लक्ष असते. मोदी सरकारला नुकतेच नऊ वर्ष पूर्ण झाले. या नऊ वर्षांची मोदी सरकारची उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपाने जे महाजनसंपर्क अभियान राबवले त्याला तोड नाही. टीफिन मिटिंग म्हणजे डबापार्टीपासून समाजातील मान्यवर लोकांना भेटण्यापर्यंत सर्व कामात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह सर्व जण सहभागी झाले. केंद्रीय मंत्रीही लोकांच्या घरोघरी जाऊन पॉम्प्लेट वाटताना दिसत होते. त्यामुळेच भाजपाला निवडणुकीत यश मिळत असते. निवडणूक मग ती ग्रामपंचायतीची असो की लोकसभेची, भाजपा ती पूर्ण तयारीने आणि जिंकण्यासाठीच लढवत असते. याचा अर्थ प्रत्येक निवडणुकीत भाजपाला विजय मिळतोच असे नाही, पण कोणत्याही पराभवाने भाजपाचे कार्यकर्ते खचत नाही, पराभवाचे दु:ख झटकत लगेच दुस-या निवडणुकीच्या तयारीला लागत असतात. भाजपाला उगीच ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणत नाही.