गुजरात मध्ये भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल ; तर काँग्रेसचा सुपडा साफ

तरुण भारत लाईव्ह न्युज : गुजरातमधील 182 विधानसभा जागांचे निकाल समोर आले आहेत. भाजपाने (BJP) बहुमत मिळविले असून असून काँग्रेसचा . सुपडा साफ झाल्याचं चित्र समोर दिसत आहे. भाजप सध्या 147 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये (Gujarat) काँग्रेसचा धुव्वा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. निकालांनुसार, काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे.

या वर्षी निकालाच्या आकडेवारीनुसार पाहता  ,2017 मध्ये भाजपने 99 जागा मिळविल्या होत्या. यावेळी भाजपला 48 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा  पूर्णपणे धुव्वा उडाल्याच पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं 2017 मध्ये विधानसभेच्या 77 जागांवर विजय मिळवला होता, मात्र यावेळी काँग्रेस केवळ 21 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 57 जागांचे नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार

गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसला मोठा फटका

गुजरात विधानसभा निवडणुकीचे कल पाहता आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये ‘आप’ 10 जागांवर आघाडीवर असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार, गुजरातमध्ये ‘आप’ला 13 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. तसेच, काँग्रेसला आतापर्यंत 26.5 टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेसची मतं ‘आप’कडे वळली असून त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडली होती. 1 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तर 5 डिसेंबरला दुसरा टप्पा पार पडला. आणि या दोन्ही टप्प्यांचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. पहिल्या टप्यात 89 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर दुसऱ्या टप्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. एकूण 182 जागांवर निवडणूक पार पडली