तोंडाला काळा कापड बांधून दोन अतिरेकी शिरले, वाचा सविस्तर

भुसावळ: रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूच्या बुकींग कार्यालयानजीक रेल्वे प्रवाशांची वर्दळ सुरू असताना शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास तोंडाला काळा कापड बांधून दोन अतिरेकी शिरले. क्षणार्धात ही बातमी प्रवाशांपर्यंत पोहोचताच प्रवाशांमध्ये थरकाप उडाला तर संशयित अतिरेक्यांनी केला सायडींगच्या रूममध्ये आश्रय घेतल्याची माहिती रेल्वे लोहमार्ग यंत्रणेला कळताच भुसावळ लोहमार्ग पोलीस निरीक्षक विजय घेर्डे यांनी अग्निशमन दल, आरोग्य पथक, बीडीडीएस, रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स व रेल्वे सुरक्षा बलाला सूचित केले. अवघ्या 15 मिनिटात यंत्रणा दाखल झाली. सुरूवातीला परीसर निर्मनुष्य करण्यात आला तर शस्त्रसज्ज जवानांनी काही क्षणात आश्रयाला लपलेल्या दोघा अतिरेक्यांचा शोध घेत ताब्यात घेतले. सुरूवातीला स्थानकात अतिरेकी शिरल्याची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये काही क्षणापुरता भीती पसरली मात्र नंतर हे केवळ सतर्कतेचे प्रात्यक्षिक (मॉकड्रिल) असल्याचे कळताच प्रवाशांच्या जीवात जीव आला.

सतर्कतेची घेतली चाचणी

सण-उत्सवाच्या काळात तसेच गर्दीच्या हंगामात अनेक अफवा यंत्रणांच्या कानावर येतात तसेच अनेकदा निनावी दूरध्वनी येतात वा वेळप्रसंगी बेवारस बॅग आढळल्यानंतर यंत्रणांचा गोंधळ उडतो. या पार्श्वभूमीवर यंत्रणेची सतर्कता व सज्जता तसेच आपत्कालीन स्थितीत घ्यावयाची काळजी या पार्श्वभूमीवर सुरक्षणा यंत्रणांनी शनिवारी सकाळी 10 ते 11.30 दरम्यान रेल्वे स्थानकावरील बुकींग खिडकीजवळ मॉक ड्रिल घेतले. जळगावच्या बीडीडीएस पथकाने अतिरेकी लपलेल्या रुममध्ये संशयीत बॅग व इतर सामान असल्याच्या अनुषंगाने रुमच्या भोवतीचे संपूर्ण क्षेत्र संरक्षीत

काही मिनिटात परीसर केला निर्मनुष्य

भुसावळ लोहमार्ग व सुरक्षा बलाने येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांना त्या भागात येण्यापासून रोखत परीसर निर्मनुष्य केला. रंगीत तालीम दरम्यान प्रवाश्यांमध्ये भीती, धावपळ निर्माण न होण्याची काळजी घेण्यात आली.

यांचा मॉकड्रीलमध्ये सहभाग

भुसावळ लोहमार्गचे पोलीस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकारी, 14 पोलीस अमलदार, जळगाव बीडीडीएस पथकातील अधिकारी, आठ अंमलदार, डॉग स्कॉड पथक, जळगाव येथील 101 चे अधिकारी व 15 पोलीस अंमलदार, आरसीपी पथक जळगावातील 16 पोलीस अंमलदार, भुसावळ आरपीएफचे चार अधिकारी 10 कर्मचारी, आरपीएफच्या दोन  श्वानासह चार कर्मचारी आदी एकूण 10 अधिकारी व 68 कर्मचारी उपस्थित होते. अग्निशामक दल, नगरपालिका स्टॉफ तसेच पोलीस ठाण्यासह बीडीडीएसची  सात वाहने सहभागी झाली