---Advertisement---
नगरपालिका, नगरपंचायत आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता राज्यातील राजकारणाचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे वळले आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये आणि १२५ पंचायत समित्यांमध्ये ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ७ फेब्रुवारीला निकाल जाहीर केले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील विटा शहरात निवडणुकीशी संबंधित एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विटा येथे भाजपाचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू आणि भानामतीसाठी वापरले जाणारे साहित्य टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. निवडणूक काळातच असा प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत कठोर कारवाईची तयारी सुरू केली आहे.
दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका बंगाली भोंदू बाबाने स्थानिक व्यक्तीच्या मदतीने हे साहित्य संबंधित घरांसमोर टाकल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर स्पष्ट झाले. हा प्रकार लक्षात येताच नागरिक आणि कार्यकर्त्यांनी त्या भोंदू बाबासह स्थानिक व्यक्तीचा शोध घेतला. दोघांना पकडल्यानंतर संतप्त जमावाने त्यांना मारहाण केली आणि शहरातून धिंड काढत थेट विटा पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेनंतर विटा शहरात एकच चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी आमदाराच्या घरासमोर असा अंधश्रद्धेचा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र पोलिसांकडून दोघांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संजय बनसोडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अंधश्रद्धेच्या आधारे कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही. नागरिकांनी अशा प्रकारांना घाबरून न जाता कायद्याचा आधार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









