काळ्याबाजारात जाणारा रेशनचा आठ लाखांचा 30 टन तांदूळ जप्त

भुसावळ ः धरणगाव येथून गोंदिया येथील राईस मिलमध्ये ट्रकद्वारा जाणारा आठ लाख 30 हजार 602 रुपयांचा रेशनचा तांदूळ नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पकडल्याने रेशन तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. नशिराबाद पोलिसात ट्रकचालक धनराज रामदास सोनवणे (43) व स्वप्नील संजय सोनवणे (20, दोन्ही भुसावळ रोड, श्रीराम नगर, मुक्ताईनगर)  व नीलेश वाणी (धरणगाव) यांच्याविरोधात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जिल्ह्यातील रेशन मालाची तस्करी करणारे मोठे रॅकेट कार्यरत असून, पोलिसांनी या रॅकेटचा बिमोड करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

धरणगावातील तांदळाचे गोंदिया कनेक्शन

पोलिसांनी ट्रकचालक धनराज रामदास सोनवणे (43) व स्वप्नील संजय सोनवणे (20, दोन्ही भुसावळ रोड, श्रीराम नगर, मुक्ताईनगर) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी 29.5 टन तांदूळ हा धरणगाव येथील रेणुका माता ट्रेडींग यार्डातून भरल्याचे सांगून नीलेश वाणी यांच्या सांगण्यानुसार 550 गोण्यांमधील हा तांदूळ गोंदिया येथील जय बामलेश्वरी सार्टेक्स येथे नेत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी ट्रकमधील तांदळाची मोजणी केल्यानंतर त्यात 29.5 टन वजनाचा व बाजारभावानुसार सुमारे आठ लाख रुपये किंमतीचा तांदुळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अन्न व पुरवठा अधिकाऱ्यांना माहिती कळवल्यानंतर अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. बुधवारी सायंकाळी उशिरा ट्रकचालकासह क्लीनर व नीलेश वाणी व संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला.

चालकाची उडाली भंबेरी, संशय बळावला

भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे हवालदार सुरज पाटील यांनी ट्रक (एम.एच.18 बी.झेड.1039) चा पाठलाग करीत गोदावरी महाविद्यालयाजवळ ट्रक थांबवला. यावेळी चालकाला वाहनातील मालाबाबत विचारणा केली. मात्र संबंधित समाधानकारक उत्तर देत नसल्याने संशय बळावल्यानंतर त्यांनी उपअधीक्षक  पिंगळे यांना माहिती कळवण्यात आल्यानंतर पोलीस कुमक दाखल झाली.