मारवडला रेशन धान्याचा काळाबाजार करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश!

अमळनेर : मारवड येथील विकास सोसायटीचे रेशन दुकान क्र. १०५ व १०६ मधील धान्यसाठा काळ्या बाजारात जात असताना येथील ग्रामस्थांनी रंगेहात पडकला. तहसीलदार अमोल वाघ यांच्या माहितीवरून सदर मालाची गाडी मारवड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही पंचनामा करून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहीतीनुसार, मारवड येथील विकास सोसायटीचे रेशन दुकान क्रमांक १०५ व १०६ मधील दुकानातून सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास दुकानातील धान्यसाठा काळ्या बाजारात जात असताना ग्रामस्थांनी रंगेहात पडकला. त्यांनतर ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल वाघ यांना फोनवरून माहिती दिली. त्यांनी लागलीच तालुका पुरवठा अधिकारी बावणे, गोडावूनचे अनिल पाटील व मारवड तलाठी भावसार यांना पाठवून माहिती घेऊन कारवाईच्या सूचना केल्या. कर्मचार्‍यांनी रेशन दुकान सील केले असून काळ्या बाजारात जाणारा मालाची गाडी मारवड पोलीस ठाण्यात जमा केली आहे. याबाबत पुढील कार्यवाही पंचनामा करून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, सदरचे रेशन दुकान हे सोसायटीचे असून संचालक मंडळ याकडे दुर्लक्ष करीत होते का? यावर नजर ठेवली जात नव्हती का? अश्या भोंगळ कारभाराला संचालक मंडळच जबादर आहे, अशा संतप्त भावना ग्रामस्थ रात्री व्यक्त करत होते. एवढा प्रकार घडूनही मोजकेच संचालक रात्री याठिकाणी आले. बाकी संचालकांनी येणे का टाळले, यावरूनही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

सेल्समनने मोबाईल उचलणे टाळले
रेशन दुकानाचे सेल्समन यांना महसुलच्या अधिकार्‍यानी संपर्क केला असता त्यांनी मोबाईल उचलणे टाळले, अशी माहिती अधिकारी बावणे यांनी सांगितले. दरम्यान, कार्यवाही नंतर संचालक मंडळ काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

यांनी पकडली गाडी
मारवड येथील ग्रामस्थ रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, जितेंद्र पाटील यांनी ही गाडी पकडली. महेश पाटील, रावसाहेब पाटील, गणेश पाटील, संजय पाटील, दिलीप पाटील, उमेश सुर्वे यांच्यसह पोलीस कर्मचारी कारवाईसाठी आले होते.