गुरुग्राम : दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये आज शिवरात्रीच्या दिवशी कावडयात्रीच्या दोन गटांमध्ये रक्तरंजित संघर्षाची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन्ही बाजूचे सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाले. परिसरात तणावपूर्ण परिस्थिती पाहता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राम सेक्टर-12 ए येथील प्रेम नगरमधील श्रावणच्या शिवरात्रीनिमित्त आज शिवमंदिरात गंगाजल अर्पण केल्यानंतर स्थानिक कावडयात्रींच्या एका गटाने तलवारी आणि काठ्यांनी दुसऱ्या गटावर हल्ला केला. यादरम्यान जोरदार दगडफेक झाली आणि अनेक वाहनांची तोडफोडही झाली. या हल्ल्यात सुमारे अर्धा डझन लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कावडीयांच्या दोन गटातील रक्तरंजित संघर्षाची ही घटना जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे.