---Advertisement---
बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात् बीएनपीच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने हिंदू नागरिकांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात आहेत हिंदूंसह अल्पसंख्यकांना धमकावून देश सोडण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगने केला.
अवामी लीगने समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ठाकुरगाव जिल्ह्यातील रुहिया पोलिस ठाणे परिसरातील ढोलरहाट भागात राहणारे हिंदू नेते बिजॉय चंद्र रॉय यांच्या घरावर बीएनपी नेते शाहिदुल इस्लाम आणि त्यांच्या सशस्त्र कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यावेळी घरांची तोडफोड आणि आग लावण्यात आली.
बिजॉय चंद्र रॉय बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवतात. हल्लेखोरांनी मानसा मंदिर उद्ध्वस्त केले आणि दोन पवित्र मूर्त्यांही फोडल्या. बीएनपीचे कार्यकर्ते हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर सातत्याने हल्ला करत आहे आणि त्यांना धमकावून देश सोडण्यास भाग पाडत आहेत.
युनूस सरकार फॅसिस्टवादी
हिंसाचार, धमकावणे, वांशिक शुद्धीकरण हाच बीएनपीचा उद्देश आहे. अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या घटनांवर अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस फॅसिस्टवादाचे पुरस्कर्ते असून देशात नरसंहारासारख्या घटना सातत्याने होत असताना त्यांचे मौन धोकादायक आहे. ढाक्यातील खिलखेत भागात असलेले दुर्गा मंदिर गेल्या महिन्यात पाडण्यात आले आणि काही दिवसांपूर्वीच कुमिल्ला जिल्ह्यात एका हिंदू महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नाही, असा आरोप अवामी लीगने केला आहे.