जळगाव । जिल्ह्यात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले. परिणामी शेतपिकांचे आणि पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक हानी बोदवडमध्ये झाली असून, मनुष्यहानीसह २२ जनावरांचा बळी गेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी व शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळांकडून करण्यात येत आहे.
गेल्या तीन दिवसात जिल्हाभरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काहीठिकाणी वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कापूस, मक्यासह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच मनुष्यहानीही झाली आहे.
नगरदेवळा आणि पिंपळगाव ता. पाचोरा येथे दोघांचा बळी गेला असताना मोठे व लहान दुधाळ, ओढकाम करणाऱ्या जनावरेही मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच ऐन हाततोंडाशी आलेलं पीक मळणीसाठी शेतात कापून ठेवलं असताना अवकाळी पाऊस पडल्यानं पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. आता आठवड्यानंतर पुन्हा एकदा अवकाळीनं हजेरी लावली आणि उरल्यासुरल्या आशाही आता मावळल्या आहेत.
अमळनेर
अमळनेर तालुक्यातील आठही मंडळांत शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मका, ज्वारी, सोयाबीन, कापूस पिकांना कोंब फुटल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे, अन्यथा पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा शेतकऱ्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देत दिला.
चोपडा
तालुक्यात या पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेतात उभे पीक व कापून झालेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची दखल अजूनही कोणी घेतलेली नाही. शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेने नायब तहसीलदार रवींद्र जोशी यांना दिले.
तालुकानिहाय पशुहानी
तालुका – मोठे दुधाळ – लहान दुधाळ – ओढकाम करणारे मोठे – लहान
पाचोरा 0१ 00 0३ 0१
बोदवड 0१ 0७ 00 00
पारोळा 0१ 0१ 00 0१
चाळीसगाव 0२ 0१ 00 00
भडगाव 0१ 0१ 00 00
जामनेर 00 00 0१ 00
एकूण 0६ १0 0४ 0२