Jalgaon News : तब्बल २० तासानंतर सापडला पुरात वाहुन गेलेल्या मुलाचा मृतदेह; कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश

जळगाव : शहरामध्ये शनिवारी दुपारी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले होते. अशातच खंडेराव नगर परिसरातील नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहा वर्षीय बालक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. दरम्यान, या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासांनी, अर्थात आज सकाळी १० वाजता पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. सचिन राहुल पवार (६, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे.

शहरातील हरी विठ्ठल नगरात मयत बालक सचिन राहुल पवार (६) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होता. शनिवार, ६ रोजी दुपारी जळगाव शहरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक भागातील नाल्यांना मोठा पूर आला होता. त्याचवेळी खंडेराव नगर परिसरातील नाल्याजवळ काही मित्रांसोबत खेळत असताना सचिन हा नाल्यात चेंडू घेण्यासाठी गेला असता  वाहून गेला होता.

दरम्यान, पोलिसांनी शोध मोहीम स्थानिक व मनपाच्या तरुणांच्या मदतीने सुरू केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत यश न मिळाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. आज सकाळी ७ वाजेनंतर पुन्हा नाल्याच्या विविध भागांमध्ये खंडेराव नगर पासून थेट राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदीकडे नाला संपतो तिथपर्यंत शोधकार्य सुरू करण्यात आले.

दरम्यान, या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासांनी, अर्थात आज सकाळी १० वाजता पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ आढळून आला. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. या मृतदेहाला पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

यांनी घेतले परिश्रम
अग्निशमन दल, स्थानिक तरुण, पोहेकॉ जितेंद्र राजपूत, उमेश पवार, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र राजपूत, इम्रान मलिक, उमेश पवार, निलेश पाटील, नाईक विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, अजय सपकाळे, कमलाकर राजहंस, जुलालसिंग परदेशी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रवींद्र भोई, दीपक महाले, गोकुळ सुतार, जगदीश बैरागी, योगेश गालफाडे, सिताराम पवार, ज्ञानेश्वर भालेराव, दुर्गेश पवार, सुपडू माळी, भगवान माळी, महानगरपालिकेचे अधिकारी कांबळे आदींच्या पथकाने शोधकार्यात परिश्रम घेतले.