जळगाव : जामनेर तालुक्यात रासायनिक खत वापरल्याने शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीप्रकरणी सोमवारी 17 रोजी कृषी विभागाच्या पथकांने चौकशी करून धडक कारवाई केली. त्यात सरदार अॅग्रो फर्टीलायझर अॅन्ड केमिकल कंपनीच्या तिघांसह बोगसखतविक्रीप्रकरणी 7 कृषी केंद्र चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सरदार रासायनिक कंपनीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकार्यांसह कृषी विभागाच्या पथकाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर कृषी विभागाने याप्रकरणातील बोगस रासायनिक खतप्रकरणी 7 कृषी केंद्र चालकांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवून कारवाई केली. 14 जुलै रोजी जामनेर तालुक्यातील मोयखेडा, दिगर, तोरणाळा, देवळसगाव, वडगाव तिघे्र, तोंडापूर, तसेच सतर 12 गावातील शेतकर्यांनी सरदार अॅग्रो फर्टीलायझर अॅन्ड केमिकल कंपनी गुजतराचे सिंग सुपर फॉस्फेट झिंकेटेड, दाणेदार व पावडर या खताचा वापर केल्याने शेतकर्यांच्या कापूस पीकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यात सुमारे 225 शेतकर्यांनी तालुका व जिल्हास्तरावर तक्रारी दिल्या होत्या. त्यानुसार 15 जुलै रोजी तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीकडून बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी कृषी विभागाने पोलिसात जि.प.चे मोहिम अधिकारी तथा खत निरीक्षक विजय पवार यांनी फिर्याद दिली. त्यानुसार सरदार अॅग्रो फर्टीलायझरचे ओम धर्मेशभाई वैष्णव राजकोट, धर्मेशभाई मोहनभाई वैष्णव, जयश्रीबेन धर्मेशभाई वैष्णव यांच्यासह कानळदा येथील पार्श्वनाथ अॅग्री टेकचे हिरेन ललित लोढा व ललित वर्धमान लोढा (रा.विसनजी नगर जळगाव) तर जामनेर तालुक्यातील मोयखेडा अभिषेक कृषी केंद्राचे मालक विलास शालीग्राम चौधरी, तोरणाळे येथील धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे मालक मुकेश धनराज पाटील, तोंडापूर बालाजी ट्रेडर्सचे मालक भारती जैन यांच्या विरोधात शेतकर्यांच्या नुकसानप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.