Agra: जगातील सात आश्चर्यांपैकी एक,ताजमहाल हि प्रेमाची निशाणी म्हणून ओळखली जाणारी वास्तू आहे. दरम्यान,आज यूपी टुरिझमला ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे. ज्यात ताजमहाल ला बॉम्बने उडून देण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर ताजमहालची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. आग्रा पोलिसांनी, मेल आणि पर्यटन विभागाला धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. ताजमहालच्या सुरक्षेसाठी एकीकडे आग्रा पोलिसांनी बाहेरील भागात तर सीआयएसएफने ताजमहालच्या आतील भागात सखोल तपासणी सुरू केली आहे. यासाठी श्वानपथक आणि बॉम्बशोधक पथकांनाही पाचारण करण्यात आले आहे.
यूपी टुरिझमला ईमेलद्वारे ताजमहाल उडवण्याची धमकी मिळाली होती. यूपीच्या पर्यटन उपसंचालक दीप्ती वत्स यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी ईमेलद्वारे ताजमहाल उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, पोलीस आणि CISF यांना माहिती देण्यात आली.
या मुद्द्यावर डीसीपी सिटी सूरज राय यांनी सांगितले की, ताजमहाल उडवण्याची धमकी देणारा ईमेल मिळाल्याच्या माहितीवरून तपास केला जात आहे. धमकीचा ईमेल कोणी आणि कुठून पाठवला याचा शोध घेतला जात आहे. ताजमहालच्या सभोवतालची सुरक्षा आधीच कडक आहे. यासंदर्भात सीआयएसएफशी बोलणीही झाली आहेत. ताजमहालची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. ताजमहाल येथे कडक तपासणी केली जात आहे. कोणत्याही संशयास्पद वस्तूची चौकशी केली जात आहे.
दररोज येतात हजारो पर्यटक
असे असतानाही पोलीस आणि इतर संबंधित पथके या धमकीला गांभीर्याने घेत प्रकरणाचा तपास करत आहेत. शहाजहान आणि मुमताज यांच्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा ताजमहाल पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येतात. यामध्ये परदेशी पर्यटकांचीही मोठी संख्या आहे. आग्राच्या कमाईचा मोठा हिस्सा ताजमहालच्या पर्यटनातून येतो.