प.बंगालमध्ये तालिबानी न्यायालयाचे कारनामे; TMC नेत्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तालिबान न्यायालयांचे एकामागून एक कारनामे समोर येत आहेत. आता न्यू जलपाईगुडी जिल्ह्यात एका महिलेने जमावाच्या मारहाणीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली आहे. एका मुलाशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून महिलेला मारहाण करून अपमानित करण्यात आले होते. महिलेला त्रास देण्यासाठी या कांगारू कोर्टचे आयोजन केल्याचा आरोप टीएमसी नेत्री आणि तिच्या पतीवर आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना न्यू जलपाईगुडी जिल्ह्यातील फुलबारी भागात घडली. दि. २९ जून २०२४ रोजी महिलेला आणि तिच्या पतीला पंचायतीमध्ये बोलावून अपमानित आणि मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेवर जमावाकडून अनैतिक संबंधाचा आरोप करण्यात आला होता. यानंतर महिलेने आरोपींच्या त्रासाला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली.

महिलेच्या पतीने सांगितले की, त्याची पत्नी कोणासोबत गेली आहे. तिच्या पतीने हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, ती काही दिवसांनी परतली. महिला परत आल्यानंतर स्थानिक नेते आणि पंचायत प्रमुख टीएमसी नेत्या मालती राय आणि तिचे पती शंकर राय यांनी तिला बोलावले. महिला आणि तिचा पती तेथे पोहोचल्यावर त्यांना गैरवर्तन करून मारहाण करण्यात आली. महिलेच्या चारित्र्यावरही संशय घेण्यात आला.

सर्वांसमोर मारहाण आणि चारित्र्यहनन पीडितेला सहन होत नसल्याचे महिलेच्या पतीने सांगितले. घरी आल्यानंतर तिने विष प्राशन केले. यामुळे तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेच्या पतीने काही लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. टीएमसी नेते मालती राय आणि शंकर राय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. शेजाऱ्यांसोबत हा वाद झाला, आम्ही तिथे उपस्थित नव्हतो, असे त्यांनी म्हटले आहे. शंकर राय यांनी सांगितले की, ती महिला काही वेळ निघून जाईल असे सांगून तिथून निघून गेली आणि तिने विष प्यायले.

याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेच्या एक दिवस आधी उत्तर दिनाजपूरमध्ये ताजेमुल इस्लाम नावाच्या माफियाने एका महिलेला खुलेआम मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर ताजेमुलला अटक करण्यात आली.