तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील २१ वर्षीय तरुणाची उधार दिलेले पैसे सर्वांसमोर मागितले याचा राग आल्याने हत्या करण्यात आल्याची घटना उघडीस आली आहे. एवढेच नाती तर संशयितांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तरुणाचा मृतदेह प्लास्टिक आणि साडीमध्ये गुंडाळून पाईपमध्ये लपविला असल्याचे पोलीस तपासात उघडीस आले आहे. या प्रकरणाची तीन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.
सागर संतोष जैस्वाल (वय २१) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर पंढरीनाथ परसराम वाघचौरे (वय २८ वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड), काकासाहेब परसराम वाघचौरे (वय ३४ वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा,कन्नड), दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके (वय २२ वर्षे, रा. कविटखेडा ता. कन्नड) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
सूत्रानुसार, सागर गेल्या २० नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. सागरच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, कन्नड तालुक्यातील औराळा येथील पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्लास्टिक आणि साडीमध्ये गुंडाळलेला होता. बेपत्ता असलेल्या सागरच्या वर्णनाशी मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते असल्याने पोलिसांनी सागरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले असता तो मृतदेह सागरचाच असल्याची ओळख कुटुंबीयांनी पटवली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असता काही दिवसापूर्वी त्याचा वाद झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना तपासात मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी तिन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सागर ने सर्वांसमोर उधार दिलेल्या पैशांची मागणी केली होती. त्यामुळे रागाच्या भरात सागरची हत्या करून मृतदेह पाईपमध्ये लाविल्याची कबुली अटक संशयितांनी पोलिसांना दिली असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.