निकालाच्या दिवशी भाजप आणि शेअर बाजार दोन्ही जल्लोष करणार ; मोदींची गॅरंटी

नवी दिल्ली :  4 जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात काय घडेल, शेअर बाजार नवीन उंची गाठेल की बाजार घसरणार? हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रत्येक सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात घोळत आहे. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते की, शेअर्स खरेदी करा आणि ठेवा, मार्केट वर जाईल. आता खुद्द पंतप्रधानांनी शेअर बाजाराबाबत काहीतरी मोठे वक्तव्य केले आहे. एका विशेष मुलाखतीत ते म्हणाले, निवडणूकपूर्व रॅलीदरम्यान भारतीय बाजारांचे मार्केट कॅप 5 ट्रिलियन डॉलरच्या जवळ पोहोचले. यानंतर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर बाजार नवीन उंची गाठेल.

पंतप्रधान मोदींनी काही काळ शेअर बाजारातील वाढीवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, “आम्ही लागू केलेल्या बाजार-समर्थित सुधारणांची गुंतवणूकदारांना चांगलीच माहिती आहे. या सुधारणांमुळे एक मजबूत आणि पारदर्शक आर्थिक परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला शेअर मार्केटमध्ये सहभागी होणे सोपे झाले आहे.

10 वर्षात सेन्सेक्स तिपटीने वाढला

पीएम मोदी म्हणाले, “मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की 4 जूनला भाजपने विक्रमी संख्या गाठताच शेअर बाजारही नवीन विक्रमी उच्चांक गाठेल.” 2014 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले तेव्हा सेन्सेक्सने 25,000 चा टप्पा ओलांडला होता आणि आता तो 75,000 च्या जवळ पोहोचला आहे, म्हणजेच 10 वर्षात सेन्सेक्स तीन पटीने वाढला आहे, असे पीएम मोदी म्हणाले. यावरून गेल्या दशकभरापासून भाजप सरकारवर शेअर बाजाराचा विश्वास असल्याचे स्पष्ट होते. गेल्या 10 वर्षांत डीमॅट खात्यांची संख्याही वाढल्याचे पीएम मोदी म्हणाले. पूर्वी डिमॅट खात्यांची संख्या केवळ 2.3 कोटी होती ती आता 15 कोटींहून अधिक झाली आहे. याशिवाय म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या 10 वर्षांत 1 कोटींवरून आज 4.5 कोटी झाली आहे.