जळगाव : जळगावसह नशिराबादमधील संशयिताला जळगाव प्रांताधिकार्यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेकायदेशीर वाळू वाहतूक, दंगलीमधील सहभाग, लोकांमध्ये दहशत माजविणे यासह इतर गंभीर गुन्हे संशयितांविरोधात गुन्हे दाखल असल्याने त्याबाबत सादर झालेल्या प्रस्तावाअंती ही कारवाई करण्यात आली.
फैजल खान अस्लम खान पठाण (22, आझाद नगर, पिंप्राळा) याच्या विरोधात जळगाव तालुका, धरणगाव व जळगाव एमआयडीसी पोलिसाज गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर वाळू वाहतुकीत त्याचा सहभाग आहे तर शेख शोएब शेख गुलाम नबी (27, ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्या विरोधात नशिराबाद पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल असल्याने या दोघांना प्रत्येकी दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करावे, असा प्रस्ताव पोलिसांनी दिला होता. प्रांताधिकार्यांनी प्रस्तावावर सुनावणीअंती 7 ऑगस्ट रोजी, हद्दपारीचे आदेश बजावले आहेत. दोघांना दोन दिवसांत जळगाव सोडून जाण्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी तसेच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांनी हद्दपारीचे प्रस्ताव तयार करून प्रांताधिकारी महेश सुधळकर यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केले होते. त्यावर नुकतीच सुनावणी पूर्ण झाली.