पाचोरा : पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीसह जळगाव जिल्हयातील मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोघा आरोपींना पाचोरा पोलीसांनी जेरबंद केले. यावेळी पथकाने दोघ चोरट्यांकडील 4 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 16 मोटर सायकली जप्त करत त्यांना अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हयात व पाचोरा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मोटार सायकली चोरीचे गुन्हे होत आहेत. पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी,अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ कविता नेरकर पवार, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांनी पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याप्रमाणे त्यांनी त्यांचे अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार पोहेकॉ राहुल काशिनाथ शिपी, पोहेकॉ रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ श्यामकांत भिका पाटील, पोकॉ योगेश सुरेश पाटील, पोकों विनोद रमेश बेलदार, पोना सचिन पवार, पोना हरीष आहिरे, पोकों सुनिल पाटील यांच्या पथकाने मोटार सायकली चोरी करणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करत चोरीचा गुन्हा उघडकिस आणला.
मोटरसायकली चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असतांना पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोटार सायकल क्रमांक (MH-१९/DE- १८१०) हिच्यासह दोन व्यक्ती संशयीतरित्या आढळून आले. त्यांची चौकशी केली असता विशाल पांडुरंग पाटील (वय- 26) (रा. गजानन नगर, मोंढाळे रोड, पाचोरा), रविद्र बाबुराव पाटील (वय -29) (रा. गोंडगाव, ता. भडगाव) यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी त्यांच्या ताब्यात असलेली मोटार सायकल ही पाचोरा पोलिसात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे आढळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांचा साथीदार माँटु हरेंद्र यादव (रा. गजानन नगर, पाचोरा) याच्यासोबत 3 लाख 90 हजार रुपये किमतीच्या 15 मोटार सायकली काढून दिल्या आहेत. पाचोरा पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याने पोलीस पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.