जळगाव : हनुमानाची भगवान श्रीरामांप्रति असलेल्या आस्थेचे सुरेख वर्णन करीत प्रयाग गौरव रत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे यांनी संगीतमय सुंदरकांड सादर केले. संगीतमय सुंदरकांडद्वारे ’ब्रह्मोत्सव’ सोहळ्याचे पहिले पुष्प २४ रोजी गुंफले गेले. सुरुवात झाली. उद्या गायिका कविता पौडवाल यांच्या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले असून मुंबई येथील श्री गौरी सावंत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे दरवर्षी प्रमाणे आयोजित ’ब्रह्मोत्सव’ यावर्षी २४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे यंदा २० वे वर्ष असून या धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा २० वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. समारोहनिमित्त यंदा देखील तीन दिवसीय ’ब्रह्मोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात तीन दिवस नाशिक येथील पंडित गयाप्रसाद चतुर्वेदी हे मंदिरात मंत्रोच्चारात महाआरती व पूजाअर्चा करणार आहेत.
शनिवार २४ रोजी संध्याकाळी ६ वाजता प्रयाग गौरव रत्न सन्मानित पंडित प्रेमप्रकाश दुबे यांच्या सुंदरकांडने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला. हनुमानाची भगवान श्रीरामांप्रति असलेल्या आस्थेचे वर्णन करीत संगीतमय सुंदरकांड पंडित दुबे यांनी सादर केले. उद्या .२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून बॉलिवूडचे गायिका कविता पौडवाल या ’एक शाम साई के नाम’ भजन संध्या सादर करणार आहेत. साईबाबांच्या जीवन कार्याचे वर्णन करणारे अप्रतिम आणि दुर्मीळ भजन कविता पौडवाल सादर करतील. उद्याचे विशेष आकर्षण म्हणजे उद्या मुंबई येथील साई सावली फाऊंडेशन (आजीचे घर) आणि सखी चार चौघीच्या संस्थापक श्रीगौरी सुरेश सावंत या उपस्थित राहणार
आहेत.
विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन
सोमवार २६ रोजी श्री साईबाबा, परमभक्त हनुमान, गायल माताजी यांचा सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार असून दुपारी ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी तीनही दिवस मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन भक्तिरसात न्हाऊन निघावे, असे आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, मधुकर झंवर, रामचंद्र झंवर, किरण झंवर, प्रवीण झंवर, सुरज (लाला) झंवर, चंद्रकांत इंदाणी, राजेंद्र इंदाणी, शरदचंद्र कासट, नितीन लढा, मनीष झंवर, राजेश दोशी, राजेश तोतला, दीपक ठक्कर, विपुल सुरतवाला, शैलेश काबरा, हितेंद्र (पप्पू) चौधरी, नरेश दोशी, सतिष अग्रवाल, कैलास मालू आदींनी केले आहे.