तरुण भारत लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । नंदुरबार शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४८ हजार रुपये किमतीचा 3 किलो 200 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा पकडला असून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला एक इसम बेकायदेशीररीत्या गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळाली. त्यानुसार त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांचे एक पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने नंदुरबार रेल्वे कॉलनी परिसरात सापळा रचला. दि. 11 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 16.45 वा. सुमारास नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरातून कंजरवाडा भागाकडे पायी एक 19 ते 20 वर्ष वयाचा अंगात काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला इसम जातांना दिसला. त्याला त्यास थांबवून सागर रविंद्र श्रीष्ट रा.गौतम नगर, रेल्वे कॉलनी, नंदुरबार याच्या पाठीवर असलेल्या बॅगची पाहणी केली. त्यात खाकी रंगाच्या प्लास्टीकमध्ये गुंडाळलेले पाच पाकीट आढळून आले. सदर प्लास्टीकचे पाकीट उघडून पाहिले असता त्यात 48 हजार रुपये किमतीचा 3 किलो 200 ग्रॅम वजनाचा हिरवट रंगाचा सुका गांजा मिळुन आला.
त्यामुळे सागर रविंद्र श्रीष्ट याला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गांजा त्याने भुर्या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे याच्याकडून घेतल्याचे सांगीतले. भुर्या याचा शोध घेतला असता तो सरोजनगर भागात मिळून आला. सागर रविंद्र श्रीष्ट, भुर्या ऊर्फ सुशिकांत गोंडीलाल शिंदे रा.सरोजनगर, नंदुरबार याच्याविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम-1985 कलम 8 (क), 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.