तरुण भारत लाईव्ह । २० मे २०२३। मान्सून एक्सप्रेस उशिरा धावत असल्याचे वृत्त ताजे असतानाच पोषक वातावरण लाभल्याने गती पकडलेल्या मान्सूनने शुक्रवारी अंदमान- निकोबार बेटांना धडक दिली. यासोबतच कृषिप्रधान देशाकरिता आवश्यक असलेल्या मान्सूनचा चार महिन्यांचा सुरु होण्याचा मार्गही मोकळा झाला. अंदमानात साधारणपणे २२ मेपर्यंत मान्सून दाखल होत असतो.
अगदी काल- परवापर्यंत मान्सूनसाठी अनुकूल असे वातावरण नव्हते, गुरुवारी सकाळपासूनच मात्र आवश्यक असलेली पोषक स्थिती निर्माण झाली आणि मान्सूनने गती पकडली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास मान्सून अंदमानात दाखल झाला, अशी घोषणा हवामान खात्याने केली. विशेष म्हणजे याच आठवड्याच्या सुरवातीला हवामान खात्याने मान्सूनला यावर्षी चार ते पाच दिवसांचा विलंब होणार असल्याचे जाहीर केले होते.
अंदमानात तो २२ ते २४ मे दरम्यान आणि केरळ मध्ये ४ जून रोजी दाखल होईल. असा हवामान खात्याचा अंदाज होता. आता अंदमानात त्याचे वेळीच आगमन झाल्याने केरळमध्येही तो वेळीच दाखल होण्याची चिन्हे आहेत. मान्सूनने बंगालचा आग्नेय भाग, निकोबार बेटे, आणि दक्षिण अंदमान समुद्र व्यापला होता.