भुसावळ : बाजारपेठ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याच्या रागातून भुसावळातील बियाणी स्कुलच्या सचिव संगीता मनोज बियाणी यांना छोटा चाकू दाखवून ठार मारण्याची धमकी देण्यात आली तसेच शिविगाळ करण्यात आली व उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली.
शुक्रवार, 7 जून रोजी घडलेल्या गुन्ह्याप्रकरणी भुसावळातील केदार सानप (रानातला महादेव मंदिर, भुसावळ) यांच्यासह अन्य एका अनोळखीविरोधात बाजारपेठ पोलिसात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भ्रष्टाचार बाहेर काढल्यानेच आपल्याविरोधात गुन्हा : केदार सानप
बियाणी परिवारातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याने कट कारस्थान करून आपल्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी केला. शहरातील जामनेर रोडवरील साई पॅलेसमध्ये त्यांनी गुरुवारी दुपारी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. सानप म्हणाले की, मुळात असा कुठलाही प्रकार घडलेलाच नाही, केवळ खोटा गुन्हा दाखल करून आपला आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. पोलिसांनी घटनास्थळी जावून चौकशी करावी जेणेकरून सत्य समोर येईल.