जळगाव : वणी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पाळधी येथील साठगर मोहल्ल्या जवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
जळगाव येथून वणी गडावर जाणारी पालखी पाळधी गावातून दरवर्षी जाते. यावेळी ही पालखी पाळधी गावातून जात असताना साठगर मोहल्ल्यातील मस्जिद जवळ येताच तिच्यावर दगडफेक करण्यात आली. या घटने नंतर एकच पळापळ सुरु झाली. घटनेची माहिती कळताच पाळधी पोलिसांनी धाव घेतली मात्र त्यांचेवरही दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे.
यावेळी जळगाव, धरणगाव येथून जादा पोलीस कुमक मागवण्यात आली तर दंगा नियंत्रण पथकही मागविण्यात आले. पोलिसांच्या गाड्यावर झालेल्या दगडफेकीत त्यांच्या गाड्यांचे काच फुटून बरेच नुकसान झाले तसेच काही दुकानावर देखील दगडफेक करण्यात आली.
पूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात पोलीस फिरून शांतता ठेवण्याचे आवाहन करीत आहेत. या बाबत उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.