नंदुरबार : मृत गायीचा विमा असल्याने पीएम रिपोर्ट देण्यासाठी गुगल पेद्वारे तीनशे रुपयांची लाच स्वीकारताना विसरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याला नंदुरबार एसीबीने अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हर्षल गोपाळ पाटील (२९) असे अटकेतील अधिकाऱ्याचे नाव आहे.
हा सापळा नंदुरबार पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सहा. पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार हेमंत महाले, हवालदार विजय ठाकरे, हवालदार देवराम गावीत. हवालदार संदीप खंडारे. हवालदार जितेंद्र महाले, नाईक सुभाष पावरा आर्दीच्या पथकाने यशस्वी केला.
असे आहे लाच प्रकरण
३२ वर्षीय तक्रारदार यांची गाय मयत झाली असून तिचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते. तक्रारदार यांच्या गाईचे शवविच्छेदन करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी हर्षल पाटील यांनी शासकीय फीचे १५० रुपये गुगल पेद्वारे घेतले. मात्र पीएम रिपोर्टसाठी पुन्हा चारशे रुपयांची लाच मागण्यात आल्याने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवून लाच पडताळणी करण्यात आली. मंगळवारी दुपारी दवाखान्यातच गुगल पेद्वारे लाच स्वीकारताच आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली व त्यांच्याविरोधात विसरवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.