नंदुरबार : रेशन दुकानाच्या बाहेर बोर्ड लावलेला नाही, रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नाही, तुमची धान्य वितरण करण्याची पध्दत बरोबर नाही, म्हणत तक्रादाराकडून महसुल कार्यालयातील गोडाऊन किपर (वर्ग ३) चे कर्मचारी दिनेश शामराव रणदिवे वय ४४ याने ३० हजाराची मागणी केली. तडजोडीनंतर २९ हजाराची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांचा पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे मुहसूल कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रणदिवे याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे अनरद ता. शहादा येथे संत मिराबाई महीला बचत गट या नावाने रेशन दुकान चालवित आहेत. दि. २१ रोजी रेशन दुकानाची पाहणी करण्यासाठी डी. एस. ओ. / जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सोबत आलोसे दिनेश रणदिवे (गोडाऊन किपर) हे गेले होते. तक्रारदार यांच्या रेशन दुकानाची पाहणी करीत असताना संबंधीत आलोसे यांनी तक्रारदार यांना सांगीतले की, रेशन दुकानाच्या बाहेर बोर्ड लावलेला नाही, रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेले नाही, तुमची धान्य वितरण करण्याची पध्दत बरोबर नाही, रेशन दुकानातील धान्य व्यवस्थित ठेवलेले नाही. असे सांगुन तक्रारदार यांच्याकडुन आलोसे दिनेश रणदिवे (गोडाऊन किपर) यांनी पैश्यांच्या स्वरुपात लाचेची मागणी केली.
दिनेश रणदिवे (गोडाऊन किपर) यांनी प्रथमतः तक्रारदार यांचेकडून साहेबांचे ३० हजार व स्वतःसाठी ५ हजार अशी एकुण ३५ हजार रु. लाचेच्या रकमेची मागणी केली. यानंतर तडजोडीअंती साहेबांच्या नावाने २५ हजार व स्वतः साठी ४ हजार अशी एकुण २९ हजार लाचेची मागणी केली. दरम्यान, तक्रादाराच्या तक्रारीनुसार अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांचा पथकाने दिनेश शामराव रणदिवे वय ४४ याच लाच घेताना रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोहवा विलास पाटील, पोहवा विजय ठाकरे, पोना अमील मराठे, देवराम गावीत, ज्योती पाटील, नावाडेकर, मनोज अहिरे, जितेंन्द्र महाले अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार पथकाने केली.