मोठी बातमी ! लाचखोर मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले

#image_title

जळगाव : एरंडोल तालुक्यातील पिपळकोठा येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक बळीराम सुभाष सोनवणे (55) यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांच्या शिफारशीनुसार, त्यांनी शिक्षकांकडून 10 हजार रुपयांची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार प्राथमिक शाळेतील शिक्षक असून, त्यांच्या शाळेचे शिक्षण विस्तार अधिकारी जे.डी. पाटील यांनी इन्स्पेक्शन दरम्यान चांगला शेरा लिहिण्यासाठी 10 हजार रुपयांची मागणी केली होती. मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांनी प्रत्येक शिक्षकाकडून 1 हजार रुपये गोळा करण्याची जबाबदारी घेतली.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर, सोमवारी सापळा रचून कारवाई करण्यात आली. 1 हजार रुपये घेताना मुख्याध्यापक बळीराम सोनवणे यांना रंगेहात पकडले. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी पाटील यांच्याविरोधातही ठोस पुरावे सापडले आहेत.

मुख्याध्यापक आणि शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकार पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे आणि पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेने शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर पुनः चर्चा सुरू झाली असून, अशा प्रकारांवर कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.