लाच भोवली! छाननी लिपीक एसीबीच्या जाळ्यात

धुळे : शिंदखेडा येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपीक सुशांत शामप्रसाद अहिरे यास 20 हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी छाननी लिपिकावर शहर पोलिसात गुन्हा करण्यात आला.  रविवारी दुपारी धुळ्यातील भुमी अभिलेख कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

जळगाव येथील महाबळ रोडवरील संभाजी नगरातील 39 वर्षीय तक्रारदाराने शिंदखेडा येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात त्यांनी करार करून काम घेतलेल्या बेटावद गावातील चार शेत जमिन गटाचे हद्द कायम पोट हिस्सा मोजणीसाठी अती तातडीचे चलन भरुन शेत मोजणीचा अर्ज सादर केला होता हे काम करुन देण्यासाठी छाननी लिपिक सुशांत शामप्रसाद अहिरे (वय 39) यांनी तक्रारदाराकडे दि. 11 नोव्हेंबर 2022 रोजी 40 हजार रुपयांची मागणी केली. त्याच दिवशी 20 हजार रूपये रोख स्वीकारून उर्वरित 20 हजार काम केल्यावर देण्यास सांगितले. त्यामुळे तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे तक्रार केली.

त्यानुसार दि.14 नोव्हेंबर 2022 रोजी व दि. 6 जानेवारी रोजी एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणी दरम्यान अहिरे यांनी 20 हजार रूपये घेण्याची समंती दर्शविली. तर आज दि. 8 रोजी रोजी 20 हजारांची लाच स्वीकारतांना धुळे येथील उपअधिक्षक, भूमी अभिलेख कार्यालयात अहिरे यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्यावर धुळे शहर पोलीस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, पोना ईश्वर धनगर, बाळू मराठे, महाजन, पोकॉ.अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने ही कारवाई केली.