‘शाळेतच घेतली लाच’: लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहात पकडले

नंदुरबार : शाळा सोडल्याच्या दाखल्यावर असलेल्या आईचे चुकीचे नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व इयत्ता दहावीचे मार्कशीटसाठी 1 हजार 600 रूपयांची लाच घेताना मुख्याध्यापकाला रंगेहात अटक करण्यात आली. ही घटना नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

नवापूर तालुक्यातील सुळी येथील माध्यमिक विद्यालयात तक्रारदार यांनी सन 2017-2018 यावर्षी इयत्ता दहावीचे शिक्षण घेतले आहे.  तक्रारदार हे त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व मार्कशीट घेण्यासाठी माध्यमिक विद्यालयात गेले. मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर रा. – साईनगरी मेन रोड, नवापूर. यांनी तक्रारदाराकडून दि.14 जानेवारी 2023 रोजी पाच हजार रुपये घेऊन तक्रारदार यांना शाळा सोडल्याचा दाखला दिला. तक्रारदार यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर त्यांच्या आईचे नाव चुकीचे असल्याने ते नाव दुरुस्त करून घेण्यासाठी व त्यांचे इयत्ता दहावीचे मार्कशीट देण्यासाठी तक्रारदार यांनी मुख्याध्यापक नंदलाल शांताराम शिनकर यांना पुन्हा विनंती केली.

यावेळी आलोसे मुख्याध्यापक यांनी तक्रारदाराकडून शाळा सोडल्याच्या दाखल्यावरील आईचे नाव दुरुस्त करून देणे व नाशिक येथील बोर्ड कार्यालयातून त्यांचे मार्कशीट आणून देण्याच्या मोबदल्यात 2 हजार रूपये लाचेची मागणी केली. त्यानंतर दि.17 जानेवारी 2023 रोजी तक्रारदाराकडून 1 हजार 600 रूपये लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र एन.एस.न्याहळदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र नरेंद्र पवार यांच्या मागदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक ला प्र वि नंदुरबार राकेश चौधरी, पो.नि. समाधान एम.वाघ. पोहवा विजय ठाकरे, पोहवा अमोल मराठे, पोना देवराम गावित यांच्या पथकाने ही कारवाई केली.