---Advertisement---
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क लावले आहे. त्यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली. यासह भारतावर एकूण ५० टक्के शुल्क लावण्यात आले आहे. अमेरिकेच्या दबावापुढे भारत झुकेल, असे त्यांना वाटले. मात्र, भारताने आता नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भारताने ब्रिक्स देशांचा पाठिंबा मिळवून अमेरिके विरोधात जणू अप्रत्यक्ष आघाडीच उघडली आहे.
भारतासाठी अमेरिका एक प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र, अतिरिक्त या शुल्कामुळे भारताने आता इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. टॅरिफ धोरणांमुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प स्वतः अडचणीत सापडल्याचे पाहायला मिळत आहे. भारतासोबतचे संबंध बिघडवल्याबद्दल त्यांच्यावर फक्त अमेरिकेतूनच नाही. इतर देशही टीका करत आहेत.
अशातच, ट्रम्प यांनी भारतावर कर लावल्यानंतर भारताने चीनसोबतचे संबंध सुधारण्यास सुरुवात केली आहे. यासाठी पीएम मोदी स्वतः चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया आधीपासूनच भारताच्या बाजूने उभा आहे. आता ब्राझीलदेखील भारताच्या बाजूने येतोय. हे चार देश एकत्र आले, तर अमेरिकेच्या वर्चस्वाला नक्कीच एक मोठा धक्का बसेल.
डोवाल यांचा मॉस्को दौरा
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल नुकतेच रशिया दौऱ्यावर गेले. डोवाल द्विपक्षीय ऊर्जा आणि संरक्षण संबंध तसेच रशियन कच्च्या तेलावरील पाश्चात्य निर्बंधांवर रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. डोवाल यांचा दौरा अशा वेळी होत आहे, जेव्हा पाश्चात्य देशांनी निर्बंध लादले असले तरी, भारत सातत्याने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करुन अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देत आहेत.
ब्राझीलचे अध्यक्ष मोदींशी चर्चा करणार
ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनीही डोनाल्ड ट्रम्प धक्का दिला आहे. अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी ट्रम्प यांच्या टैरिफवर म्हटले की, ब्राझील जागतिक व्यापार संघटनेसह (डब्ल्यूटीओ) सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करून त्यांचे हित जपेल. ते ट्रम्प यांना टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावणार नाहीत, कारण अमेरिकन नेते बोलू इच्छित नाहीत. परंतु ते चीनचे प्रमुख शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींशी फोनवर चर्चा करणार आहेत.