दुसखेड्यात भरदिवसा चोरी : वृद्धाचे हातपाय बांधले अन्.., साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

पाचोरा : घरात एकटेच असलेल्या ८७ वर्षीय वृद्धास चाकूचा धाक दाखवत, हातपाय बांधून कपाटातील ६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. यामुळे घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना तालुक्यातील दुसखेडा येथे गुरुवारी, भरदिवसा दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दुसखेडा येथे एकनाथ पांडू पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. गुरुवारी, २९ रोजी  दुपारीदोनच्या सुमारास त्यांचा मुलगा शेतात व घरातील महिला गल्लीतील एका महिलेकडे पापड तयार करण्यासाठी गेले. घरात एकनाथ पाटील वय ८७ हे एकटेच पलंगावर झोपून होते. दुपारी दोनच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेला व हातमोजे घातलेला युवक घरात घुसला. त्याने एकनाथ पाटील यांना चाकूचा धाक दाखवत पलंगावरून उठवले व त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून मागच्या खोलीत नेले. तेथे हातपाय बांधून बाजूला ढकलून दिले.

दरम्यान, चोरट्याने घरातील गोदरेजच्या कपाटातील पाच लाख रुपयांची रोकड व ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा ६ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. पोलिसांना घटना कळताच त्यांनी लागलीच घटनास्थळाला भेट दिली, श्वानपथक पाचवरण केले. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपासचक्र गतिमान केले आहेत.

दरम्यान, एकनाथ पाटील यांच्याकडे नातवाचा लग्न सोहळा असल्याने त्यांनी लग्नसोहळ्यासाठी घरात रोकड व दागिने ठेवले होते. याची माहिती असणाऱ्यांनीच ही लूट केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.