मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील चांगोटोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबडीसाठी झालेल्या वादातून भावाने स्वतःच्या बहिणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत फुलवानबाई उईके (वय 34) तिच्या आईवडिलांसह राहात होती. तिचा भाऊ दिलीप पंद्रे देखील त्याच घरात वेगळ्या खोलीत राहत होता. संध्याकाळी दिलीप दारू पिऊन घरी परतला. त्याचवेळी त्याच्या दाराशी ठेवलेल्या टोपलीतून कोंबडी बाहेर पडली. ही कोंबडी फुलवानबाईची होती. कोंबडी उघडी का सोडली यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
रागाच्या भरात बहिणीवर कुऱ्हाडीने वार
वाद उग्र स्वरूप धारण करताच दिलीपने रागाच्या भरात घरातील कुऱ्हाड घेतली आणि फुलवानबाईच्या मानेवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या फुलवानबाईला रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.
हेही वाचा : Honda QC1: होंडाने लाँच केली त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत आणि रेंजबद्दल जाणून घ्या सविस्तर…
आरोपी फरार, पोलिसांचा शोध सुरू
खून केल्यानंतर दिलीप घटनास्थळावरून पळून गेला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. मृताच्या आईने सांगितले की, कोंबड्या उघड्या का आहेत, या क्षुल्लक वादातून हा प्रकार घडला. मृत फुलवानबाई तिच्या पती आणि तीन मुलांसह तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती. दुसरीकडे, आरोपी दिलीपची पत्नी दारूच्या व्यसनामुळे त्याला सोडून गेली होती, आणि तो मुलासह राहत होता. चांगोटोला पोलीस या घटनेचा तपास करत असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. या हत्याकांडामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.