जमावाकडून बेदम मारहाण : एकाचा मृत्यू

जळगाव : तालुक्यातील आसोदा येथे एका व्यक्तीला मुलीची छेड काढण्याच्या संशयावरुन मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवार ४ जुलै रोजी घडली. तालुका पोलीसांत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा गावात भास्कर दगडू भंगाळे (वय ४३)हे आपल्या कुटुंबासह राहतात. गुरुवार ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील गोकुळ नगर याठिकाणी गेला होता. यावेळी त्याने मुलीची छेड काढल्याच्या संशयावरून काही महिला व पुरुषांनी त्याला जाब विचारला. तर काहींनी त्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये भास्कर भंगाळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पोलिसांनी उपचारासाठी दाखल केले होते. त्यास वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन देवचे यांनी तपासून मयत घोषित केले. या घटनेप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक महेश शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच शासकीय रुग्णालयात येऊन घटनेची माहिती जाणून घेतली.