भुसावळ : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने तलवार बाळगून दहशत निर्माण केल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर संशयीतास रविवारी रात्री सव्वादहा वाजता मच्छीमार्केट भागातून पकडण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून धारदार तलवार जप्त करण्यात आली. आकाश उर्फ चॅम्पीयन श्याम इंगळे (२४, पंचशील नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तलवारीसह आरोपी जाळ्यात
आरोपी चॅम्पीयन इंगळे यास गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मात्र, आरोपी शहरात विनापरवागी दाखल होवून तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. रविवारी रात्री सव्वा दहा वाजता आरोपी मच्छी मार्केट समोरील नाल्याच्या पुलावर तलवार बाळगून आरडा-ओरड करीत दहशत निर्माण करीत असताना पथकाला आढळल्याने त्यास अटक करण्यात आली.
आरोपीच्या ताब्यातून ५०० रुपये किंमतीची व २२.५ इंच लांबीची तलवार जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार निलेश चौधरी करीत आहेत. यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय नेरकर, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल अमर आढाळे आर्दीच्या पथकाने केली.