…तर गप्प बसणार नाही; मुंब्र्यात मराठी युवकासोबत दादागिरी, मनसेने दिला थेट इशारा

मुंब्रा येथे एका मराठी युवकासोबत घडलेल्या दादागिरीच्या घटनेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. विशाल गवळी या युवकाने फळविक्रेत्याला मराठी का येत नाही ? म्हणून विचारलं, त्यावर जमावाने विशालला कान पकडून माफी मागायला लावली. आज विशाल या तरुणाने मनसे नेते अविनाश जाधव यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट मुंब्र्यात घुसण्याचा इशारा दिला आहे.

घटना कशी घडली ?

विशाल गवळी औषध खरेदीसाठी बाहेर गेला होता. त्यानंतर फळ खरेदी करत असताना फळविक्रेता हिंदीत बोलत असल्याचे पाहून त्याला मराठीत बोलण्यास सांगितले. त्यावरून वाद निर्माण झाला आणि परिस्थिती बिघडली.

मनसेने दिला थेट इशारा

घटनेनंतर विशाल गवळीने मनसे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले, “मुंब्र्यात मराठी माणसासोबत अपमानास्पद घटना घडल्याने आम्ही थेट हस्तक्षेप करू. मराठी अस्मिता आणि अस्तित्वावर वार होत राहिले, तर मनसे गप्प बसणार नाही.”

“मराठीत बोलायला सांगितलं तर जमाव जमतो?”

घटनेनंतर उलट विशालवरच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला आणि त्याच्या आईला तासन्तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. “मराठीत बोलायला सांगितल्यावर जमाव जमतो? पोलीस ठाण्यात घोषणाबाजी केली जाते? याला थांबवले नाही तर मराठी माणसावर होणारे हल्ले वाढतील,” असे जाधव म्हणाले.

“एकत्र या, नाहीतर परिस्थिती बिघडेल”

“महाराष्ट्रात मराठी माणसावर हल्ले वाढत आहेत. जर मराठी माणसांनी एकत्र येऊन आवाज उठवला नाही, तर भविष्यात चौकाचौकात त्यांच्यावर हल्ले होतील. आता मनसे त्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

मराठी अस्मितेसाठी लढा उभारण्याचा संदेश

मनसेच्या या भूमिकेमुळे मुंब्रा घटनेने मराठी अस्मितेच्या संघर्षाची ठिणगी पेटवली आहे. यावर पुढील कायदेशीर आणि सामाजिक पावले काय उचलली जातात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.