Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. जसप्रीत बुमराह पूर्णपणे तंदुरुस्त असून, तो लवकरच मैदानावर उतरणार आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. ७ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या आयपीएल सामन्यापूर्वी जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. परंतु या सामन्यात त्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
पाठीच्या शस्त्रक्रियेनंतर, बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये पुनर्वसन करत होता, जिथून अलिकडेच एका अहवालात असे म्हटले होते की त्याच्या पुनरागमनाबद्दल अजूनही सस्पेन्स आहे. परंतु, आता बुमराह मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्याची बातमी समोर आली आहे. बुमराह सामने खेळण्याबाबत, सध्या याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही. पण, असे मानले जाते की तो १३ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळू शकतो.
२०१३ पासून जसप्रीत बुमराह मुंबईच्या वेगवान गोलंदाजीची ताकद आहे. तेव्हापासून त्याने मुंबई इंडियन्ससाठी १३३ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १६५ विकेट्स घेतल्या आहेत. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आयपीएल २०२३ मध्ये खेळू शकला नाही.