तरुण भारत लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२२ । चोरीचे सत्र दिवसेंदिवस वाढतच असून एरंडोल तालुक्यातील पातरखेडा येथे पुन्हा चोरीची घटना घडली आहे. यात अज्ञात चोरटयांनी तब्ब्ल ४ लाख ५० हजार रोकड व एक हजार रुपयाचे चांदीचे दोन शिक्के लंपास केले आहे. ही घटना ८ डिसेंबर २०२२ रोजी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
बळवंत दिनकर पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांनी पाटील यांच्या घरी ८ डिसेंबरला लोखंडी दरवाज्याचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान, घरातील लोखंडी कपाटातील ४ लाख ५० हजार ची रोख रक्कम व एक हजार रुपये किमतीचे चांदीचे दोन शिक्के या प्रमाणे ऐवज लंपास करून धूम ठोकली.
याप्रकरणी बळवंत पाटील यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून भा. द. वि. कलम २८०,४५७,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील, मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव अमळनेर भाग अमळनेर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.