MSRTC Ticket Price Hike : एसटी महामंडळाच्या बसने प्रवास कऱणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. एसटी महामंडळ बसच्या तिकीटदरात मोठी वाढ करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे.
सुत्रानुसार, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे. मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळाकडून १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव शासनाला देण्यात आला आहे.
जर दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांच्या तिकिटामागे १५ जास्तीचे मोजावे लागणार आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. महामंडळाला प्रति दिवस १५ कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचे सांगितले जात आहे.
एसटी महामंडळाने तिकिटाच्या दरात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला असला तरी नवीन सरकार नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.