अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे राज्यातील पोटनिवडणुका पुढे ढकला : चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेली अडचण लक्षात घेता राज्यात होऊ घातलेल्या पोटनिवडणुका समोर ढकलण्यात याव्या अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. याबाबत राज्याचे निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांच्याशी चर्चा, सचिव सुरेश काकाणी व राज्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची आज सोमवारी भेट घेतली.

अतिवृष्टी व पूर परिस्थिती लक्षात घेता या निवडणुका पावसाळा संपल्यानंतर घेण्यात याव्या अशी विनंती श्री बावनकुळे यांनी केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील विविध जिल्ह्यातील ११ नगर परिषदांमधील ११ प्रभाग व हातकणंगले नगर पंचायतीच्या अध्यक्षपदाच्या रिक्त जागेसाठी १२ ऑगस्ट २०२४ रोजी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सर्व होऊ घातलेल्या पोटनिवडणुका ग्रामीण भागाशी संबंधित आहेत, हे विशेष.

राज्यात सर्वदूर् पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या कामाला लागला आहे. तसेच मागील चार पाच दिवसांपासून अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्या जाहीर केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्याच जिल्ह्यात पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत.