जळगाव प्रांताधिकाऱ्यांना हद्दपार आरोपीने दिली धमकी

जळगाव ः हद्दपार आरोपीने थेट जळगावचे प्रांताधिकारी महेश सुधाळकर यांना दूरध्वनीवरून धमकी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. मला हद्दपार का केले ? अशी थेट विचारणा आरोपीने केल्यानंतर रामानंद पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी धुळे जिल्ह्यात केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. भूषण रघुनाथ सपकाळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

 हद्दपार केल्याच्या रागातून धमकी

जळगावात प्रांताधिकारी म्हणून महेश सुधाळकर हे उपविभागीय दंडाधिकारी आहेत. शुक्रवार, 22सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलिस स्टेशन हद्दीत ते आपल्या निवासस्थान परीसरात असतांना त्यांना मोबाईलवर कॉल आला. पलीकडून बोलणाऱ्या भूषण रघुनाथ सपकाळे याने महेश सुधाळकर यांना मला हद्दपार का केले ? अशी धमकी वजा विचारणा करीत भीती व धाक निर्माण होईल, अशी कृती केली.

शिवाय आरोपीने प्रांतांच्या निवासस्थान गाठत गेटवर पुन्हा शिपायाला साहेब कुठे आहेत? अशी विचारणा करीत धमकी देत दहशत निर्माण करणारी भाषा वापरली.  याप्रकरणी शनिवार, 23 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता महेश सुधाळकर यांनी दिलेल्या तक्रार अर्जानुसार रामानंद नगर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय विठ्ठल पाटील करीत आहेत. दरम्यान, विविध पोलीस ठाण्यात 9 गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (32, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढल्याच्या रागातून आरोपीने थेट प्रांतांनाच विचारणा करीत धमकी दिली.