जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद येथील ग्रामपंचायतीत उपसरपंचपद शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी निकालानुसार रिक्त होते. या प्रकरणी निकाल जाहीर झाल्यानंतर किमान १ महिन्याचे आत निवड प्रक्रिया अंमलबजावणी करणे आवश्यक होते. परंतु, या रिक्त जागेवर निवड प्रक्रिया राबविण्यात कसून केल्याप्रकरणी सरपंच सरला संजय सपकाळे यांना सरपंचपदावर राहण्यास अनर्ह तथा अपात्र करण्यात आले. हा निर्णय विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिला आहे. विभागीय आयुक्तांच्या या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
वाकोद येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र भगवान भगत यांची निवड सार्वत्रिक निवडणूक २०२१ दरम्यान नियमानुसार झाली होती. यात वाकोद ग्रामपंचायतीचे ११ सदस्य अपात्र करण्यात यावेत, संदर्भात तक्रारदार अर्चना दीपक गायकवाड यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यात आले होते. यातील बरेच अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेत्या सुनावणीनुसार अपात्र करण्यात आले होते. तसेच काही अर्ज निर्णय होणे बाकी होते. त्यानुसार अपात्र सदस्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हादंडाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत दोन्ही सरकारी जागांवर अतिक्रमण केल्याचे चौकशीअंती सिध्द झाले होते. त्यानुसार जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार २९ मे २०२३ रोजी वाकोद ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र भगवान भगत यांना पदावरून अपात्र केले होते. तेव्हापासून वाकोद ग्रामपंचायत उपसरपंचपद रिक्त होते.
सरपंच सरला सपकाळे यांनी उपसरपंच अनर्हता निर्णयानंतर नियम अंतिमानुसार ३० दिवसांच्या आत उपसरंपच पदाचे रिक्तत्पद भरण्यासंदर्भात प्रक्रिया अंमलबजावणी करणे आवश्यक असताना सरपंच सरला सपकाळे यांनी कर्तव्यात कसूर केली. गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेले उपसरपंचपद भरलेले नाही. याला सरपंच सरला सपकाळे हे जबाबदार असल्याचे ठरवून त्यांना अपात्र करण्यात यावे, असा अहवाल जिल्हा परिषदच्या माध्यमातून विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडे पाठविण्यात आला. या अहवालाचे अवलोकन केल्यानंतर नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सरपंच सरला संजय सपकाळे यांना अपात्र करण्याचा निकाल दिला आहे. मूळ तक्रारदार अर्चना दीपक गायकवाड यांच्यातर्फे अॅड. विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले. या कारवाईमुळे जामनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.