सी-20 आणि नागपूर

अग्रलेख…
(C-20) दिवाळीला बरेच महिने शिल्लक आहेत अजून. पण, नागपूरकरांनी गेला आठवडाभर दिवाळी साजरी केली. संपूर्ण शहर रोषणाईने न्हाऊन निघाले होते. जागोजागी दिव्यांच्या माळा, ग्लो साईन बोर्डस्, रंगीबेरंगी स्तंभ, थोरांच्या प्रतिमा, स्वच्छ चकचकीत व दुतर्फा सजलेले रस्ते आणि चौक. नागपूरच्या विमानतळावरून शहरात शिरताना अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. निमित्त होते सी-20 च्या बैठकीचे. सी-20 म्हणजे सिव्हिल-20. जी-20 या संघटनेचे अध्यक्षपद सध्या भारताकडे आहे. जी-20 ही संयुक्त राष्ट्राच्या खालोखाल महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संघटना. ही संघटना म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्णय घेण्याचा एक मंच आहे. जी-20 च्या अंतर्गत अनेक अभ्यास गट कार्यरत आहेत. भारतात सध्या त्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यातल्या सी-20 म्हणजे सिव्हिल-20 गटाची बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने देशोदेशीचे पाहुणे नागपुरात आले होते. त्या सार्‍यांना नागपूरच्या आदरातिथ्याने आणि या शहराच्या सौंदर्याने भुरळ पाडली. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासनातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या योगदानातून सी-20 च्या बैठकीचे उत्तम आयोजन नागपुरात झाले. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले पाहिजे.
gtfg
सी-20 च्या बैठकीचे महत्त्व जी-20 च्या संदर्भात वेगळे आहे. जी-20 मध्ये जगातील मोठ्या अर्थव्यवस्था असलेले 19 प्रमुख देश आणि युरोपियन युनियन यांचा समावेश आहे. भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, दक्षिण कोरिया, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्तान, ब्रिटन, अमेरिका इत्यादींसह काही निमंत्रित देशही जी-20 मध्ये आहेत. युरोपियन युनियन ही जी-20 ची सदस्य असल्यामुळे युरोपातली 27 राष्ट्रे यात आहेतच. जी-20 तील सर्व विकसित व विकसनशील देश मिळून जागतिक उत्पादनापैकी 80 टक्के वाटा उचलतात. 75 टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार याच देशांमार्फत होतो. जगाची दोन तृतीयांश लोकसंख्या जी-20 देशांमध्ये आहे आणि सुमारे 60 टक्के भूमीवर हे देश पसरलेले आहेत. 1999 मध्ये जागतिक अर्थकारणाला धक्के बसायला सुरुवात झाल्यानंतर जी-20 ची स्थापना झाली. 2008 पासून दरवर्षी किमान एकदा जी-20 ची परिषद होते. त्यात राष्ट्रप्रमुख, देशांचे अर्थमंत्री, विदेश मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर, आर्थिक विषयातील तज्ज्ञ, धोरणात्मक अभ्यास गटांचे प्रतिनिधी असे विविध प्रकारांचे लोक सहभागी होतात. जी-20 अंतर्गत बी-20 म्हणजे बिझनेस-20, एल-20 म्हणजे लेबर-20, पी-20 अर्थात पार्लियामेंट-20, सी-20 अर्थात सिव्हिल-20, सायन्स-20, स्टार्टअप-20 असे विविध गट यजमान देशात जाऊन व तिथल्या लोकांशी, अभ्यासकांशी, मान्यवरांशी संवाद साधून जागतिक परिस्थितीचा अंदाज घेतात आणि काही शिफारशी करतात. सिव्हिल-20 च्या नागपुरातील बैठकीचे महत्त्व या अनुषंगाने फारच मोठे आहे. कारण, सिव्हिल-20 किंवा सी-20 मध्ये मानवी जीवनाला स्पर्श करणार्‍या जवळजवळ प्रत्येक मुद्याचा ऊहापोह झाला. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, शाश्वत विकास, पर्यावरण, कला व हस्तकला, लोकशाही, मानवाधिकार अशा विविध विषयांवर मंथन झाले.
मुख्य म्हणजे भारत जगाकडे कसे पाहतो, (C-20) हे देशोदेशीच्या प्रतिनिधींना कळले. त्यातले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निरोपाचे भाषण फारच वेगळे होते. गडकरींनी फार सुरेख पद्धतीने भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्म-अध्यात्म आणि विचार परंपरेचा परिचय जागतिक समुदायाच्या प्रतिनिधींना करून दिला. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचार परंपरेचा विशेष उल्लेख करताना त्यांनी जसे नागपूर शहराचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये सांगितली, त्याचप्रमाणे पर्यावरण रक्षणासाठी आम्ही काय करीत आहोत, याचीही माहिती उपस्थितांना दिली. प्रदूषण हा सार्‍या जगापुढचा प्रयत्न आहे. त्यावरचे गडकरींचे भाष्य महत्त्वाचे होते. ते म्हणाले की, हरित इंधन हे आपल्या जागतिक समुदायाचे भविष्य आहे, याची खूणगाठ मनाशी बांधून आम्ही जिवाश्म इंधनापासून मुक्ती मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आम्हाला कार्बन उत्सर्जन लवकरात लवकर शून्यावर आणायचे असून हे जग अधिक आरोग्यदायी व आनंदी बनवायचे आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सारे जग एक कुटुंब असल्याची भावना व्यक्त केली. या बैठकीला माता अमृतानंदमयी, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांच्यासह जागतिक समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या सार्‍यांना गडकरी आणि फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या प्रतिपादनातून जे काही मिळाले, ते सारे भारतीयतेच्या अनुषंगाने फार प्रभावी होते. आयोजने अनेक प्रकारची होत असतात. पैसा खर्च करणे आणि भव्य कार्यक्रमाचे आयोजन करणे ही आजकालची रीतच आहे. पण, जागतिक समुदायाला आपण एक शहर किंवा राज्य म्हणून नव्हे तर भारत देश म्हणून सामोरे जाणार आहोत आणि त्यामुळे भारतीय परंपरा, संस्कृती, विचार, तत्त्वज्ञान या सार्‍यांचे दर्शन घडले पाहिजे, हा विचार या आयोजनामागे होता. सिव्हिल हा शब्द मूळचा लॅटीन भाषेतून इंग‘जी व अन्य पाश्चात्त्य भाषांमध्ये आला. याचा अर्थ होतो नागरिक किंवा नागरी समुदाय. असा सभ्य नागरिकांचा समुदाय स्वार्थी असू शकत नाही. त्यामुळेच तो आपल्यासह इतरांचाही विचार करतो, हेच या परिषदेच्या मंथनातून सिद्ध झाले. भारतीय अध्यात्माच्या परंपरेची ताकदही या परिषदेने जगाला दाखवून दिली आणि नागपूर शहराच्या आयुष्यभर जपून ठेवण्यासार‘या स्मृतींची देणगी पाहुण्यांना दिली. नागपूर हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. याच शहरातील दीक्षाभूमीवरून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी मन्वंतर घडवून आणले. याच शहरात सुमारे शतकभरापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या जगातल्या सर्वांत मोठ्या स्वयंसेवी संघटनेचे बीजारोपण झाले. या शहराला महात्मा गांधींसारख्या अनेक थोरांचे पाय लागले. स्वातंत्र्य लढ्याच्या काळात नागपूर हे भारतातील प्रमुख केंद्र होते. स्वातंत्र्योत्तर काळातही त्याचे विविध विचारांचे, सकारात्मक चळवळींचे केंद्र म्हणून महत्त्व कायम राहिले.
अंधश्रद्धा निर्मूलन असो किंवा स्त्री मुक्तीची चळवळ, (C-20) कामगारांचा लढा असो वा मुक्या प्राण्यांवरील अत्याचार रोखण्याचे प्रयत्न असोत; नागपूर सर्व बाबतीत पुढारलेले शहर आहे. वैचारिक वैविध्य असूनही या शहराच्या मातीतून मानवी एकोप्याचा, सहअस्तित्वाचा आणि सौहार्दाचाच गंध येतो. जागतिक समुदायाला सामोरे जात असताना विचार आणि त्यातही आचरणात आणण्याजोगा विचार महत्त्वाचा असतो. असे अनेक प्रकारचे विचार सिव्हिल-20 च्या मंथनातून बाहेर आले आहेत. त्यामुळेच जुलै महिन्यात राजस्थानातील जयपूर येथे होत असलेल्या सिव्हिल-20 च्या शिखर परिषदेत नागपुरातील परिषदेदरम्यानच्या मंथनाचा अर्कही विचारात घेतला जाणार आहे. नागपूरचे भौतिक वैभव दिवसागणीक वाढतेच आहे. या शहरात मेट्रो रेल्वे आली आहे. या शहरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (ट्रिपल आयटी), भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अशा जागतिक स्तरावर नावाजलेल्या संस्था आहेत. याच शहरात जगातील सर्वांत सुंदर व अव्वल दर्जाचा तरंगता संगीतमय कारंजा आणि नागपूरचा जिवंत इतिहास दर्शविणारा लाईट अ‍ॅण्ड साऊंड शो आहे. तो पाहून विदेशी पाहुण्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होता. याशिवाय, नागपुरातले आतिथ्य व प्रेम त्यांनी अनुभवले. शिवाय, या शहराची वैचारिक श्रीमंतीही त्यांच्या लक्षात आली. भौतिक विकास आवश्यकच असतो. पण, वैचारिक समृद्धीदेखील तितकीच महत्त्वाची असते. सिव्हिल-20 च्या निमित्ताने एका नव्या विचारपर्वाची पायाभरणी नागपुरात झाली आहे. त्यामुळे सिव्हिल-20 ची परिषद आटोपली असली, तरी अशा प्रकारचे मंथन आणि त्यानुसार कृती कार्यक्रमांच्या आखणीचा शुभारंभ नागपुरात व्हायला हरकत नाही. त्याचा फायदा नागपूर-विदर्भ-महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला होऊ शकेल. सिव्हिल-20 ची सांगता एका नव्या आरंभाचे मागणे मागून झालेली आहे. नागपूर हे भरभरून देणार्‍यांचे शहर म्हणून प्रसिद्ध असेल तर त्या आरंभाला आता फारसा उशीर होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करणे उचित ठरेल.