सोयगाव : शेतामध्ये लागवड केलेल्या पपईच्या बागेत गांजाची झाडे लावली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी शेतात छापा टाकून २ लाख ४८ हजार रुपये किमतीचा ४९ किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक केली. मंगळवार, १० रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी व फर्दापूर पोलिसांनी ही कारवाई चारुतांडा (मूर्ती) ता. सोयगाव शिवारात गटनं. ११० येथे केली. आकाश भगवान राठोड (वय. २३ रा. चारुतांडा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
पपईच्या बागेत प्रतिबंधित गांज्याची झाडे लावली असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी व फर्दापूर पोलीसांच्या पथकाने शेतात छापा टाकला. पपईच्या बागेत गांज्याची सहा ते सात फूट उंचीची एकूण २४ झाडे आढळून आली. सर्व झाडे उपटून पोलीस ठाणे फर्दापूर मध्ये आणण्यात आली आहे. त्याचे वजन केले असता, जवळपास ४९ किलो हा गांजा भरला. त्याची अंदाजे किंमत २ लाख ४८ हजार रुपये असल्याचे पोलीसांनी सांगितले. पोलीसांनी संशयित शेतकऱ्याला अटक करुन अमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत फर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला. तपास फर्दापूर पोलीस सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे, पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे, मीरखा तडवी, विनोद कोळी, प्रकाश कोळी, प्रदीप बेदरकर, होमगार्ड हे करीत आहे.