अहिल्यानगर, जामखेड : शहरात सोमवारी पहाटे एक दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बीडहून जामखेडकडे येणाऱ्या कारने डिव्हायडरला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर सीएनजी टाकीचा स्फोट होऊन कारने पेट घेतला. या भीषण आगीत कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू झाला.
कशी घडली दुर्घटना?
सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास बीडहून जामखेडकडे येणाऱ्या एका कारचा अपघात झाला. गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकली आणि फरफटत गेली. या धडकेनंतर सीएनजी टाकीने पेट घेतला आणि काही क्षणांतच कार जळू लागली. कारच्या अत्याधुनिक सुरक्षितता प्रणालीमुळे ती लॉक झाली, त्यामुळे आत असलेल्या दोघांना बाहेर पडता आले नाही. मृतांमध्ये जामखेड पोलिस ठाण्यातील पोलीस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल आणि साईनाथ पान शॉपचे व्यापारी महादेव दत्ताराम काळे यांचा समावेश आहे.
गंभीर जळाल्यामुळे ओळख पटवणे कठीण
अपघात एवढा भीषण होता की, कारमधील दोघेही पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे त्यांची ओळख पटवणे कठीण झाले. मात्र, घटनास्थळी पोलिस कर्मचारी गुडवाल यांचा मोबाईल सापडला, त्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. गाडी महादेव काळे यांच्या मालकीची असल्याचे समजल्यावर मृतांची ओळख निश्चित करण्यात आली.
अपघातानंतर परिसरात खळबळ
या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ताबडतोब पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतले. सध्या या अपघाताचा सविस्तर तपास सुरू आहे. या अपघातात पोलिस कर्मचारी धनंजय गुडवाल आणि व्यापारी महादेव काळे यांचा मृत्यू झाल्यामुळे जामखेड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.