छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या एक महिला एजंटवर जिल्ह्यातील करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यमंत्र्य एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी पैसे घेणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असं जाहीर केले आहे. यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्यावरून हा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वंदना मस्के ही प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचं लेटर हेड वापरते. या पदावरून तिनं यापूर्वीच उपोषणाचा इशारा दिला होता. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते. वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याची तक्रार काही महिलांनी तहसीलदारसमोर केली होती, त्यानंतर या महिलांचे जबाब नोंदवून घेत तहसिलदारांनी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
अनुदान मंजूर करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के ही गोरगरीब महिलाकडून पैसे उकळत होती. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी म्हस्के यांच्याकडं विचारणा केली असता ही महिला धमक्या देत असल्यानं महिलांनी तहसीलदारांकडं धाव घेतली होती.