---Advertisement---
भुसावळ : शहरातील नाहाटा कॉलेजसमोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेदरम्यान दोन तरुणांनी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे गोंधळ उडाला. याप्रकरणी चेतन उर्फ अतुल बाळू सावकारे (वय ३९, रा. तुळजापूर भवानी मंदिर, भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून मयूर संजयकुमार सावकारे व त्याचा भाऊ हर्षल सावकारे (दोन्ही रा. स्टेट बँकेजवळ, भुसावळ) यांच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीतील माहितीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता चेतन सावकारे हे त्यांच्या मित्रांसह मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभेला उपस्थित होते. सभास्थळी मयूर सावकारे हा येऊन मोठमोठ्याने ओरडू लागला. ‘माझा भाऊ हर्षलने मला पुढे पाठवले, आम्ही दोघे मिळून सभा होऊ देणार नाही,’ असे तो बोलत होता. त्याने फिर्यादी चेतन सावकारे यांची कॉलर पकडून ढकलले. तसेच त्यांच्यासह तेथे उपस्थित लोकांना अश्लील शिवीगाळ केली.
यावेळी मयूर सावकारे यांनी हिंदू धर्माबाबत अवमानकारक वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावतील, असे शब्द वापरत्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, असे विधान करून सभेतील शांतताभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘स्टेजवर शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवू नका, अन्यथा राडा करू,’ असेही तो ओरडत होता, असे तक्रारीत नमूद आहे.
गोंधळ वाढताच जमाव आक्रमक झाला असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित इसमाला तावडीतून सोडवत पोलीस स्टेशनमध्ये आणले. या घटनेत मयूर सावकारे व त्याचा भाऊ हर्षल सावकारे यांच्याविरुद्ध धार्मिक भावना दुखावणे, अश्लील शिवीगाळ करणे, धमकी देणे तसेच ज्यामुळे शांतताभंग होईल असे वर्तन करणे अशा गुन्ह्यांखाली भुसावळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.









