जळगावात सहा लाखांची रोकड चोरली अन् बसने गाठले शिरपूर, चौकशीत उघड

---Advertisement---

 

जळगाव : गुरांचा बाजार परिसरातील सहा दुकानांमधून सहा लाख रुपयांची रोकड लांबविणाऱ्या चोरट्यांनी चोरीनंतर रिक्षातून बसस्थानक गाठल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

बसस्थानकातून एका बसमध्ये बसून चोरटे शिरपूरपर्यंत व तेथून ते खासगी वाहनाने मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात गेल्याचे समोर आले असून एमआयडीसी पोलिस तपासासाठी तेथे रवाना झाले आहेत. घटना २४ नोव्हेंबरला उघड झाली होती.

एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, राहुल तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दुकानांच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दुकानांमध्ये चोरी केल्यानंतर चार चोरटे भुसावळ रस्त्यावरील कालिंका माता मंदिरापर्यंत पायी चालत गेले.

दोन पुढे व दोन जण मागे चालत असताना त्यातील मागील दोन जणांनी एक रिक्षा थांबवून त्यातून ते अजिंठा चौफुलीपर्यंत पोहोचले. तेथून दुसरी रिक्षा करून ते बसस्थानकापर्यंत गेल्याचे फुटेजमधून समोर आले आहे. बसस्थानकात गेल्यानंतर तेथून ते पहाटे एका बसमध्ये बसून गेले.

जळगाव बसस्थानकातून बसमधून गेलेले चोरटे शिरपूरपर्यंत गेल्याचे अधिक तपासात पुढे आले आहे. बसस्थानकातून ज्या बसमध्ये चोरटे गेले तिचा एमआयडीसी पोलिसांनी शोध घेऊन वाहकाची माहिती काढली.

त्या वाहकाला फुटेज दाखवून अशा वर्णनाचे चार जण बसमधून गेले का व कोठे उतरले याची माहिती घेतली असता चोरटे शिरपूरपर्यंत गेल्याचे समजले. तेथून ते एका खासगी वाहनातून खरगोन जिल्ह्यातील एका गावात गेले. या सर्व माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिस त्या गावाला रवाना झाले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---