जळगाव : राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने शेतकऱ्यांकडे असलेले गोवंशीय, म्हैसवर्गीय तसेच शेळी मेंढी आदि दुग्धोत्पादन तसेच शेतीपयोगी कामात येणाऱ्या पशुधनाची गणना १९१९ पासून करण्यात येत आहे. मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागांतर्गत सप्टेबर ते आक्टोबर दरम्यान पशुगणना करण्यात येत असून आतापर्यंत २० पशुधन गणना करण्यात आल्या आहेत. यावर्षी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान देशभरात २१ वी पशुगणना करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली.
पशुगणना केवळ धोरणकर्त्यासाठीच नाही तर शेतकरी, व्यापारी, उद्योजक, दुग्धउद्योग आणि सर्वसामान्यांसाठीही उपयुक्त असल्याने दर पाच वर्षांनी ही गणना केली जात आहे. शासनाच्या मत्स्योद्योग, पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पशूपालन आणि दुग्ध व्यवसाय विभागातर्फे या पशुधन गणनेसाठी शुक्रवार ३० रोजी जिल्हा परिषद सभागृहात कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेसह जिल्हाभरातील पशुसंवर्धन विभागाचे २९८ पशुवैद्यकिय, पशुधन विस्तार अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच अन्य कर्मचारी आदी उपस्थित होते. पाळीव पशुंची माहिती आणि आकडेवारी अचूकपणे प्राप्त व्हावी यासाठी आधुनिक तंत्रप्रणालीयुक्त मोबाईल अॅपचा वापर करण्यात येणार आहे. मोबाईल अॅपचा वापर कसा करावा, याचीदखील माहिती या कार्यशाळेत देण्यात आली असून या २९८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकातर्फे सोमवार २ सप्टेबरपासून २१ व्या पशुगणनेची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय ग्रामीण साठी ३१३ आणि शहरी भागासाठी ८५ प्रगणक नियुक्त आहेत. यात तालुका अमळनेर ग्रामीण १८ (शहरी २), जळगाव २८ (१६), भडगाव ११ (३), जामनेर ३०(१०), भुसावळ १७ (७), मुक्ताईनगर १४(२), बोदवड १२(३), पाचोरा २५ (५), चाळीसगाव ३६ (६), पारोळा १९ (५), चोपडा २७ (३), रावेर २७ (७), धरणगाव १४ (५), यावल २४ (७), एरंडोल (४) असे एकूण ग्रामीण भागात ३१३ तर शहरी भागात ८५ प्रगणक नेमण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा परिषद पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. श्यामकांत पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वाहेद तडवी आदी अधिकारी उपस्थित होते.
आतापर्यंत २० पशुगणना करण्यात आल्या असून सोमवार २ सप्टेबरपासून २१ वी पशुधन गणनेसाठी जिल्ह्यात १५ तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. पशुधन पर्यवेक्षक गणना कर्मचारी ग्रामीण तसेच शहरी भागात घरोघरी जाऊन पशुमालकांकडे असलेले गोवंश, म्हैसवर्गीय तसेच कुक्कूट, वराह आदी पशुधनाची माहिती नोंदविण्यात येणार असून टॅगींग केल्याशिवाय पशुगणना करू नये, अशा सूचनाही प्रगणकांना देण्यात आल्या आहेत.
– डॉ. श्यामकांत पाटील, – उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद, जळगाव